बॉबी माकन हत्याकांड प्रकरण : लिटील गँगची तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 09:56 PM2019-05-13T21:56:54+5:302019-05-13T21:58:34+5:30
ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंग ऊर्फ बॉबी माकन यांच्या हत्येत सहभागी असलेली लिटील गँग सोमवारी तुरुंगात पोहोचली. न्यायालयाने पोलीस कोठडीची परवानगी नाकारत लिटीलसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी अंतर्गत तुरुंगात पाठवले. आता फरार आरोपी मंजीत वाडे पोलिसांच्या हाती लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंग ऊर्फ बॉबी माकन यांच्या हत्येत सहभागी असलेली लिटील गँग सोमवारी तुरुंगात पोहोचली. न्यायालयाने पोलीस कोठडीची परवानगी नाकारत लिटीलसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी अंतर्गत तुरुंगात पाठवले. आता फरार आरोपी मंजीत वाडे पोलिसांच्या हाती लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
बॉबी माकनचे २५ एप्रिल रोजी रात्री जरीपटका येथून अपहरण करण्यात आले होते. दीक्षितनगर येथील घराजवळ त्याची कार बेवारस सापडल्याने तो बेपत्ता असल्याचे लक्षात आले होेते. त्याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून बॉबीचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर २८ एप्रिल रोजी कोंढाळी येथे त्याचा मृतदेह सापडल्याने त्याची हत्या केल्याचे आढळून आले. बॉबी बेपत्ता झाल्यापासून लिटील सरदार आणि मंजित वाडे याच्यावर संशय घेतला जात होता. अपहरणासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी सापडल्याने लिटीलच्या टोळीतील हनी चंडोक याला अटक केल्यावर या हत्येचा पर्दाफाश झाला.
गुन्हे शाखा पोलिसांनी ४ मे रोजी लिटील, त्याचा बॉडीगार्ड सीटू गौर आणि मित्र बाबू खोकर याला अटक केली. नंतर इनोव्हाचा माक बिट्टू भाटिया यालाही अटक करण्यात आली. अटक झाल्यापासूनच लिटील या हत्याकांडामागचे खरे कारण लपवित आहे. त्याच्यावर गोळीबार केल्याच्या संशयात बॉबीचा खून करण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे. मंजित वाडे यानेच गळा आवळून त्याचा खून केल्याचे तो सांगत आहे. परंतु कमाल चौकातील कोट्यवधी किमतीच्या जमिनीचा वाद हे हत्येचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. पोलिसांना मंजित वाडेचा अजूनही पत्ता लागलेला नाही.
लिटील तुरुंगात जाईपर्यंत मंजित पोलिसांच्या हाती लागणार नाही, अशी शक्यता लोकमतने वर्तविली होती. त्यामुळे पोलीस मंजितचा पत्ता लावू शकली नाही. आता कुठल्याही क्षणी मंजित वाडेला अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तोसुद्धा हत्येचे मुख्य कारण सांगण्याऐवजी पोलिसांची दिशाभूल करेल, याचीच अधिक शक्यता आहे. मंजित हासुद्धा सराईत गुन्हेगार आहे. त्याने भिसीच्या धंद्यात मोठी संपत्ती जमविली आहे. तो सट्टा आणि जुगार अड्डाही चालवतो. सूत्रानुसार लिटील गँगने सुरक्षित सुटण्याच्या अटीवरच बॉबीची हत्या केल्याचे सांगितले जाते.
प्रतिबंधात्मक कारवाई होणार
शहर पोलीस लिटील गँगच्या विरुद्ध कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. लिटील गँगच्या विरुद्ध गोळीबार प्रकरणानंतर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. यात लिटील गँगसोबत बिट्टू भाटियाही सहभागी होता. त्यानंतर मात्र लिटील गँगविरुद्ध कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई झालेली नाही.