बॉबीची हत्या पूर्व नागपुरातील वादातीत जमिनीवरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 08:46 PM2019-06-12T20:46:17+5:302019-06-12T20:49:20+5:30
ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंह ऊर्फ बॉबी माकनच्या हत्येचे कारण पूर्व नागपुरातील एक वादातीत जमीन असल्याचे उघडकीस आले आहे. या वादाचे मुख्य कारण उघडकीस येऊ नये म्हणून हत्येतील आरोपी मंजित वाडे हा दीड महिन्यानंतरही गुन्हे शाखेच्या हाती लागला नसल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या या अपयशामुळे बॉबीचे कुटुंबीय आणि लिटील गँगच्या विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंह ऊर्फ बॉबी माकनच्या हत्येचे कारण पूर्व नागपुरातील एक वादातीत जमीन असल्याचे उघडकीस आले आहे. या वादाचे मुख्य कारण उघडकीस येऊ नये म्हणून हत्येतील आरोपी मंजित वाडे हा दीड महिन्यानंतरही गुन्हे शाखेच्या हाती लागला नसल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या या अपयशामुळे बॉबीचे कुटुंबीय आणि लिटील गँगच्या विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.
यामुळे उत्तर नागपुरात कोणत्याही क्षणी नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दीक्षितनगर येथील रहिवासी बॉबीचे २५ एप्रिल रोजी जरीपटका येथून अपहरण करण्यात आले होते. घराजवळच त्याची कार बेवारस स्थितीत सापडल्याने त्याचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले. त्याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून अपहरण झाल्याचे निश्चित झाले. २८ एप्रिल रोजी कोंढाळी येथे त्याचा मृतदेह सापडल्याने त्याची हत्या झाल्याची बाब उघडकीस आली. यापूर्वीच लिटील सरदार व मंजित वाडे यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. इनोव्हाच्या आधारावर पोलिसांनी लिटील गँगचा सदस्य हनी चंडोकला अटक करून हे खूनप्रकरण उघडकीस आणले होते. ४ मे रोजी लिटील, त्याचा बॉडीगार्ड सीटू गौर आणि मित्र बॉबी खोकर याला अटक करण्यात आली. नंतर इनोव्हाचा मालक बिट्टू भाटीयाला अटक करण्यात आली. विचारपूस केली असता दीड वर्षापूर्वी त्याच्यावर गोळीबार केल्याच्या संशयातून बॉबीची हत्या करण्यात आल्याचे सांगितले होते. त्याने मंजित वाडेने गळा आवळून बॉबीची हत्या केल्याचे सांगितले होते. खुनाचे इतर कुठलेही दुसरे कारण नसल्याचेही त्याने सांगितले होते. पोलीस मंजितला शोधण्याचा दावा करीत होते. परंतु त्याला पकडू शकले नाही. लिटीलची कोठडी संपल्याने मंजित आता पकडला जाणार नसल्याबाबत लोकमतने आधीच खुलासा केला होता. लिटील आणि त्याच्या साथीदाराची पोलीस कोठडी संपून एक महिना लोटला आहे. परंतु मंजितचा अजूनही पत्ता नाही.
सूत्रानुसार बॉबीच्या हत्येचे खरे कारण समोर येऊ नये म्हणूनच मंजित पोलिसांच्या हाती लागत नाही. असे सांगितले जाते की, पूर्व नागपुरातील एका वादातीत जमिनीवरूनही बॉबी आणि लिटील गँगमध्ये वाद सुरू होता. लिटीलही या जमिनीच्या सौद्यात सहभागी होऊ इच्छित होता तर बॉबी सुद्धा आपल्या संपर्काच्या माध्यमातून या जमिनीचा सौदा करण्याच्या तयारीत होता. कोट्यवधी रुपये किमतीची ही जमीन आहे. अनेक वर्षांपासून ती वादग्रस्त असल्यामुळे अनेकांची त्यावर नजर आहे. अकोला येथील एक पुढारी आणि पूर्व नागपुरातील गँगस्टरसह अनेक जण या जमिनीच्या सौद्यात इच्छुक होते. त्यांच्यात अनेकदा बैठकीही झाल्या. बॉबीपर्यंतही हा वाद आला होता. मंजित सापडल्याने वादाचे कारण समोर येईल या भीतीने लिटील गँगने मंजितला गायब केले. मंजितच्या शोधात पोलीस पंजाबपर्यंत जाऊन आले. पंजाबमधील अनेक ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली पंरतु तो पोलीस येण्यापूर्वीच गायब होत आहे.
लिटील गँगविरुद्ध पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. परंतु प्रतिस्पर्ध्यांना तो लवकरच जामिनावर बाहेर येण्याची भीती आहे. त्यामुळे उत्तर नागपुरातील त्याचे बहुतांशी प्रतिस्पर्धी भूमिगत झाले आहेत. समाजसेवा आणि फायनान्स कंपनीची वसुली आणि आरटीओच्या दलालीचे काम करणाऱ्या टोळीला सर्वाधिक चिंता लागली आहे. या टोळीने बॉबीच्या हत्येनंतर सहानुभूती मिळवण्याचे नाटकही केले होते. याची माहिती होताच लिटील गँगही त्याला अद्दल शिकवण्याचा तयारीत आहे.