तथागत बुद्ध अन् सम्राट अशोक यांच्याशी नाते सांगणारा दीक्षाभूमीतील बोधिवृक्ष ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:07 AM2021-05-26T04:07:22+5:302021-05-26T04:07:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : समस्त बौद्धांची प्रेरणाभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीक्षाभूमी परिसरात डौलाने उभा असलेला बोधिवृक्ष हा साधासुधा ...

Bodhi tree in Deekshabhoomi relating to Tathagata Buddha and Emperor Ashoka () | तथागत बुद्ध अन् सम्राट अशोक यांच्याशी नाते सांगणारा दीक्षाभूमीतील बोधिवृक्ष ()

तथागत बुद्ध अन् सम्राट अशोक यांच्याशी नाते सांगणारा दीक्षाभूमीतील बोधिवृक्ष ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : समस्त बौद्धांची प्रेरणाभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीक्षाभूमी परिसरात डौलाने उभा असलेला बोधिवृक्ष हा साधासुधा पिंपळाचा वृक्ष नव्हे तर ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाले, त्या कुटुंबातील वारसा होय. त्यामुळे या बोधिवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुद्धगयेतील बोधिवृक्षाचा वारसा असलेला हा बोधिवृक्ष सम्राट अशोकाशीसुद्धा संबंधित असून दीक्षाभूमीत मात्र तो श्रीलंकामार्गे पोहोचला हे विशेष.

तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन करून भारतभूमीला बुद्ध धम्म दिला. त्यानंतर सम्राट अशोकाने तथागतांचा धम्म देशविदेशात पोहोचविला. संघमित्रा आणि महेंद्र या आपल्या मुलांना बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवले. श्रीलंकेत प्रचारासाठी जात असताना त्यांनी बुद्धगयेतील मूळ बोधिवृक्षाची फांदी नेली. या फांदीचे त्यांनी श्रीलंकेतील अनुराधापूर येथे मोठ्या श्रद्धापूर्वक रोपण केले. श्रीलंका सरकारने या बोधिवृक्षाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. बोधिवृक्षाभोवती कंपाऊंड आणि वर सोन्याचा कळस चढवला.

श्रीलंकेतील या बोधिवृक्षाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणण्याचे कार्य भदंत आनंद कौसल्यायन यांनी केले. भदंत कौसल्यायन हे बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक व विचारवंत म्हणून जगभर विख्यात होते. श्रीलंकेत त्यांना मोठा मान होता. दीक्षाभूमीशी त्यांचे नाते दृढ झाल्यानंतर हा बोधिवृक्ष दीक्षाभूमीवर आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष दादासाहेब गायकवाड व कार्यवाह सदानंद फुलझेले यांचा सिंहाचा वाटा होता. भदंत कौसल्यायन यांच्या विनंतीवरून श्रीलंका सरकारने संसदेत ठराव पारित केला व १९६८ साली या बोधिवृक्षाच्या फांदीला भारतात आणण्याची परवानगी मिळाली. तीन वेगवेगळे कोवळे बोधिवृक्ष कुंडीत ठेवण्यात आले. विमानाने त्यांना भारतात आणण्यात आले.

१२ मे १९६८ साली दीक्षाभूमीवर समारंभपूर्वक त्याचे रोपण झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब गायकवाड होते. एकाच ठिकाणी या तिन्ही वृक्षांना आदरपूर्वक स्थान देण्यात आले. ते एकमेकांमध्ये मिसळून असे वाढले की, बघणाऱ्यांना तो एकच वृक्ष वाटावा. या पद्धतीने तथागतांच्या बुद्धत्वाचा वारसा जपणाऱ्या बुद्धगयेतील बोधिवृक्षाला दीक्षाभूमीवर पोहोचण्यासाठी श्रीलंकेचा मार्ग अवलंबावा लागला.

बॉक्स

बोधिवृक्षाची घेतली जाते विशेष काळजी

दीक्षाभूमी येथील बोधिवृक्ष हा विस्तीर्ण असा पसरला आहे. येथे येणाऱ्यांसाठी त्याचे वेगळेच महत्त्व आहे. स्मारक समितीच्या वतीने त्याची विशेष काळजी घेतली जाते.

Web Title: Bodhi tree in Deekshabhoomi relating to Tathagata Buddha and Emperor Ashoka ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.