तिघांचे मृतदेह गवसले, दाेघांचा शाेध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:04+5:302021-09-07T04:12:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : अम्मा का दर्गा येथे दर्शनासाठी आलेल्या दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील पाच तरुण रविवारी (दि.५) ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : अम्मा का दर्गा येथे दर्शनासाठी आलेल्या दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील पाच तरुण रविवारी (दि.५) सकाळी ९ वाजताच्या सुमारास कन्हान नदीत बुडाले. यातील एकाचा मृतदेह रविवारी, तर दाेघांचे मृतदेह साेमवारी (दि. ६) शाेधण्यात बचाव पथकाला यश आले. अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले. उर्वरित दाेघांचा शाेध मंगळवारी (दि. ७) घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.
बुडालेल्या तरुणांमध्ये सय्यद अरबाज उर्फ लकी (२२,) अय्याज बेग हाफीज बेग (२०), शेख अबुजर शेख अलताफ (१८), ख्वाजा बेग कालू बेग (१७) व शेख सबतैयन शेख इकबाल (२१) सर्व रा.दिग्रस, जिल्हा यवतमाळ या पाच जणांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच, एसडीआरएफ व गाडेघाट (ता.पारशिवनी) येथील पुरुषाेत्तम कावळे यांच्या जीवन सुरक्षा पथकाच्या सदस्यांनी शाेधकार्य सुरू केले.
दरम्यान, रविवारी दुपारी ख्वाजा बेग कालू बेग याचा मृतदेह आढळून आला हाेता. साेमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सय्यद अरबाज उर्फ लकी याचा तर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उनगाव (ता.कामठी) शिवारात शेख सबतैयन शेख इकबाल याचा मृतदेह आढळून आला. ओळख पटल्यानंतर दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.
विशेष म्हणजे, हे १२ जण आधी नागपूर शहरातील माेठा ताजबाग व नंतर कन्हान जवळच्या अम्मा का दर्गा येथे दर्शनासाठी आले हाेते. यातील सात जण वाहनात बसून आराम करीत हाेते, तर पाच जण कन्हान नदीत पाेहण्यासाठी उतरले हाेते. पाेहताना ते प्रवाहात आले व गटांगळ्या खात वाहात गेले. एसडीआरएफच्या पथकाने सायंकाळी ६.३० वाजता अंधारामुळे बचावकार्य बंद केले.
एसडीआरएफच्या बचाव पीएम प्रकाश नेमाने, उपनिरीक्षक घनश्याम दुग्गे, सी.एस. मडावी, शांताराम हारगुडे यांचा समावेश हाेता. हे शाेधकार्य तहसीलदार प्रशांत सांगोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागबान, पोलीस निरीक्षक विलास काळे, कन्हानचे तलाठी क्षीरसागर, कांद्रीचे तलाठी पालंदूरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.