फरार आरोपीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:36 AM2017-08-27T01:36:58+5:302017-08-27T01:37:16+5:30
वाघाच्या अवशेष चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला रामटेक तालुक्यातील सिल्लारी येथील पेच प्रकल्पाच्या वन कोठडीत ठेवण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : वाघाच्या अवशेष चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला रामटेक तालुक्यातील सिल्लारी येथील पेच प्रकल्पाच्या वन कोठडीत ठेवण्यात आले होते. हा आरोपी या वन कोठडीतून पळून गेला होता. नऊ दिवसानंतर त्या आरोपीचा मृतदेह पारशिवनी तालुक्यातील ढवलापूर शिवारात शनिवारी दुपारी आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची तसेच आरोपीच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे वन अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महादेव चैतराम उईके (४९, रा. ढवलापूर, ता. पारशिवनी) असे मृत आरोपीचे नाव आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी-उसरीपार परिसरात काही दिवसांपूर्वी वाघाचा मृतदेह आढळला होता. त्या वाघाची शिकार करण्यात आल्याचा दावा वन अधिकाºयांनी करीत या शिकारप्रकरणी एकूण १७ जणांना अटक करण्यात आली.
आरोपींमध्ये महादेवचाही समावेश होता. त्याला सिल्लारी येथील वन कोठडीत ठेवले होते. तो १८ आॅगस्ट रोजी पहाटे या वन कोठडीतून पळून गेला होता. तेव्हापासून आजवर वन कर्मचारी त्याचा शोध घेत होते. दुसरीकडे त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार नोंदवून घातपाताची शक्यताही व्यक्त केली होती. दरम्यान, ढवलापूर-नरहर रस्त्यावरील वाघदेव मंदिराजवळच्या शेतात काही महिला मजुरांना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महादेवचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी तर नरहर, कोलितमारा, ढवलापूर येथील नागरिकांनी पारशिवनी पोलीस ठाणे गाठले.
या प्रकारामुळे पोलिसांनी महादेवचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात न आणता परस्पर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये रवाना केला. मृतदेह असलेल्या वाहनात महादेवचा एक नातेवाईक होता. वन अधिकाºयांनी (पेंच व्याघ्र प्रकल्प) त्याला मध्येच वाहनातून उतरवून दिले आणि एका खबºयाला त्या वाहनात घेऊन गेले, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
वन अधिकाºयांच्या विरोधात तक्रार
मृत महादेव उईके याच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी पारशिवनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला होता. त्यातच जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह यादव पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचले. महादेवचा मृत्यू संशयास्पद असून, घातपाताची शक्यताही त्याच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे यादव यांच्या पुढाकाराने पारशिवनी पोलीस ठाण्यात एसीएफ गीता नन्नावरे, पवनी बफर झोनचे आरएफओ पांडुरंग पाकळे, नागलवाडीचे आरएफओ नीलेश गावंडे यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली.