गिट्टीखदानमध्ये वृद्धेचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:29+5:302021-08-18T04:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बहुमजली इमारतीत राहणाऱ्या एका वृद्धेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बहुमजली इमारतीत राहणाऱ्या एका वृद्धेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. तिच्या गळ्यावर चाकूचा वार आहे. मात्र, घरचे, शेजारी यांनी दिलेली माहिती तसेच एकूणच परिस्थिती लक्षात घेता तिने आत्महत्या केली असावी, असा तर्कवजा अंदाज पोलिसांनी लावला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मेहड गिरजाशंकर सिंग (वय ७०) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या वाडी दाभा टोल नाक्याजवळच्या अशोका एन्क्लेव्ह सोसायटीत पाचव्या माळ्यावर राहत होत्या. त्यांना बिपीनकुमार सिंग (वय ३५) नामक एक मुलगा असून तो ट्रान्सपोर्टींगचे काम करतो. कामाच्या निमित्ताने तो हैदराबादला गेला होता. घरात ही वृद्धा, तिची सून रिंकी (वय ३०) आणि सहा वर्षांची नात होती. नेहमीप्रमाणे रिंकी यांना मंगळवारी सकाळी ७ वाजता जाग आली. त्या बाजूच्या खोलीत गेल्या तेव्हा सासू रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली. रिंकी यांनी आरडाओरड करून बाजूला राहणाऱ्यांना बोलवून घेतले. नंतर हैदराबादला गेलेल्या पतीला फोन करून सांगितले. बिपीनकुमारने त्याच्या मित्रांना माहिती देऊन घरी पाठविले. नियंत्रण कक्षात फोन करून माहिती कळविण्यात आली. त्यानंतर गिट्टीखदान पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. मेहड यांच्या गळ्यावर चाकूची चुभकनी मारल्याचे दिसून येत होते. मोठा रक्तस्त्राव झाल्याने रक्ताचे थारोळे जमले होते. पोलिसांनी रिंकी, बाजुला राहणारे तसेच तेथील सिक्युरिटी गार्डला प्रदीर्घ विचारपूस केली. सदनिकेचे दार आतून लावून होते. शिवाय आतमध्ये बाहेरचा कुणीही आला नसल्याचे गार्डस् नी पोलिसांना सांगितले. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या, असा प्रश्न उपस्थित झाला.
----
विविध व्याधींमुळे होत्या त्रस्त
मेहड सिंग नामक वृद्धेची हत्या झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून सर्वत्र पसरले. त्यामुळे पोलीस उपायुक्त विनिता साहू, गजानन शिवलिंग राजमाने यांनीही तेथे भेट देऊन पाहणी केली. या इमारतीत राहणारे तसेच घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहड यांना झोप येत नव्हती. जेवण जात नव्हते. याशिवाय अन्य व्याधींमुळेही त्या त्रस्त होत्या. गळ्यावरचे चाकूचे छोटे छिद्र बघता मेहड यांनी व्याधींमुळे त्रस्त होऊन स्वत:च्या गळ्यावर चाकू मारून घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला. तूर्त या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. वैद्यकीय अहवालानंतर कारवाईची दिशा ठरवू, असे पोलीस अधिकारी सांगत आहेत.