अनाथालयातील युवतीचा मृतदेह विहिरीत

By Admin | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:18+5:302016-04-03T03:52:18+5:30

श्रद्धानंद अनाथालयात राहणाऱ्या एका युवतीचा मृतदेह विहिरीत आढळला. नेहा रमेश कठाळे (वय १७) असे मृत युवतीचे नाव असून, ...

The body of an orphaned girl in the well | अनाथालयातील युवतीचा मृतदेह विहिरीत

अनाथालयातील युवतीचा मृतदेह विहिरीत

googlenewsNext

नागपूर : श्रद्धानंद अनाथालयात राहणाऱ्या एका युवतीचा मृतदेह विहिरीत आढळला. नेहा रमेश कठाळे (वय १७) असे मृत युवतीचे नाव असून, तिने आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, ते रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
२००६ मध्ये जरीपटका परिसरात फिरताना दिसल्यामुळे नेहाला एका नागरिकाने जरीपटका पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी तिच्या आईवडिलांचा आणि घराचा पत्ता तिला विचारला. त्यावेळी नेहा केवळ सात वर्षांची होती. आपण हिंगण्यात राहतो, असे तिने सांगितले. त्यावरून पोलिसांनी तिला हिंगणा परिसरात फिरवले. मात्र, त्यावेळी नेहाला तिच्या घराचा पत्ता सांगता आला नाही. काही दिवसानंतर समज आल्यामुळे तिने आपल्या पित्याचे नाव आणि मौदा, माथनी येथील मामा गोविंदराव खडसेचे नाव सांगितले. मात्र, त्यांचाही पत्ता लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला श्रद्धानंद अनाथालयात दाखल केले. तेव्हापासून नेहा तेथे राहत होती.
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे अनाथालयातील लगबग सुरू झाली. नेहा दिसत नसल्याने तिची शोधाशोध सुरू झाली. बाजूच्या विहिरीत एका कर्मचाऱ्याने डोकावले असता त्याला नेहाचा मृतदेह आढळला. त्यामुळे अनाथालयात एकच खळबळ निर्माण झाली. सकाळी ८ च्या सुमारास प्रतापनगर पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पंचनामा वगैरे आटोपल्यानंतर पोलिसांनी मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला.

शवगृहातही प्रतीक्षा
युवावस्थेत असलेल्या नेहाला आपल्या पालकांची शेवटपर्यंत आस होती. वडील, मामा किंवा अन्य कुणी नातेवाईक येतील आणि येथून घरी नेतील, असे तिला वाटायचे. मात्र, अखेरपर्यंत तिला न्यायला कोणताच नातेवाईक आला नाही. प्रतापनगर पोलिसांनी आजही तिचे वडील आणि मामाचा हिंगणा तसेच मौदा-माथनी परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच आढळले नाही. दरम्यान, तिच्या जवळचे कुणीच नसल्यामुळे आणि तिचे पालकत्व अनाथालयाकडेच असल्यामुळे पोलिसांनी अनाथालय प्रशासनाकडे वारंवार संपर्क करून शवविच्छेदनासाठी येण्यास सांगितले. तथापि, अनाथालय प्रशासनाकडून दुपारी ४ पर्यंत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनाथ नेहाच्या मृतदेहाला शवगृहातही बरीच प्रतीक्षा करावी लागली. शेवटी अनाथालयाचा एक कर्मचारी तेथे आला आणि शवविच्छेदन करून पोलिसांनी मृतदेह अनाथालयाच्या कर्मचाऱ्याच्या हवाली केला.

Web Title: The body of an orphaned girl in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.