शनिवारी कुवैतला रवाना होणार बोईंग-७७७; १ ऑक्टोबरला दुसरे विमान येणार
By मोरेश्वर मानापुरे | Published: September 26, 2023 10:48 PM2023-09-26T22:48:54+5:302023-09-26T22:49:08+5:30
टॅक्सी-वे अद्ययावत होण्याची अपेक्षा
नागपूर : मिहान-सेझ परिसरातील एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.च्या (एआयईएसएल) एमआरओमध्ये १५ सप्टेंबरला आलेले कुवैत एअरलाइन्सचे बोईंग-७७७-३०० ईआर विमानाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे. देशातील एआयईएसएलच्या सर्व एमआरओमध्ये मेजर चेककरिता पहिले विदेशी विमान नागपुरात आले आहे.
एमआरओला एफएए प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एआयईएसएलच्या चमूने नागपूर एमआरओमधील सुविधांची माहिती दिली होती. त्यानंतर कुवैत एअरलाइन्सने यात रूची दाखविली आणि चार विमानांची देखभाल व दुरुस्तीचा कंत्राट दिला. विदेशी विमानाला मेजर चेककरिता एमआरओपर्यंत आणण्याच्या कामात एआयईएसएलने एएआय, कस्टम्स, एमएडीसी, एमआयएल आणि डीसी-एसईझेडचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शनिवारी एआयईएसएलचे कार्यकारी संचालक अनिल कुमार कपूर यांच्या हस्ते पहिले कुवैती विमान रवाना करण्यात येणार आहे. त्यानंतर कुवैत एअरलाइन्सचे दुसरे बोईंग-७७७ विमान १ ऑक्टोबरला मेजर चेकसाठी नागपुरात उतरणार आहे. या विमानाची प्रवाशी संख्या ३५० एवढी आहे.
टोईंगने प्रतिमा खराब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते एमआरओपर्यंत जुळलेल्या टॅक्सी-वे वरून देखभाल व दुरुस्तीसाठी येणाऱ्या विमानाला अद्यापही पॉवर टॅक्सिंग करता आलेले नाही. शिवणगांवचे गेट असल्याने टॅक्सी-वे ऑपरेशनल एरियात सामील झालेले नाही. गेल्या सात वर्षांपासून हीच स्थिती आहे. यामुळे घरगुती विमानाची देखभाल व दुरुस्तीसाठी काम चालू शकते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधांसाठी एमआरओची प्रतिमा खराब होत आहे.