बोर्इंगचे इंजिन २०१९ मध्ये नागपुरात तयार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:19 AM2018-12-17T11:19:52+5:302018-12-17T11:22:58+5:30
बोर्इंग-७७७ आणि ७८७ विमानाचे इंजिन वर्ष २०१९ च्या अखरेपर्यंत नागपुरात तयार होणार आहे. याकरिता मिहानमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरस्तीसह जोडणीवर भर देण्यात येत आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोर्इंग-७७७ आणि ७८७ विमानाचे इंजिन वर्ष २०१९ च्या अखरेपर्यंत नागपुरात तयार होणार आहे. याकरिता मिहानमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरस्तीसह जोडणीवर भर देण्यात येत आहे.
बोर्इंग कंपनीच्या या दोन मॉडेलच्या विमानाचा जगात व्यावसायिक उपयोगासाठी जास्त वापर होतो. देशातही बोर्इंगच्या विमानाचे मार्केट आहे. त्यांच्या ओव्हरहॉलकरिता अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकसोबत (जीई) एअर इंडिया एमआरओने करार केला आहे. जीईने एमआरओमध्ये बोर्इंग-७७७ चे जीई-९० इंजिन टेस्टिंगकरिता पाठविले होते. त्याचे यशस्वीरीत्या टेस्टिंग करण्यात आले.
बोर्इंग-७७७ विमानाच्या इंजिनच्या (जीई-९०) टेस्टिंगसाठी डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हील एव्हिएशनकडून (डीजीसीए) मंजुरी मिळाली आहे. याशिवाय या इंजिनची दुरुस्ती आणि देखभाल आणि जोडणीकरिता डीजीसीएकडून परवानगी अद्याप मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीजीसीएची चमू एमआरओचे आॅडिट करणार आहे. त्यानंतर एमआरओला या इंजिनचे ओव्हरहॉल व जोडणीची मंजुरी मिळणार आहे. डीजीसीएपूर्वी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (एआयइएसएल) अंतर्गत आॅडिट करणार आहे.
बोर्इंगच्या दोन्ही विमानांच्या इंजिनसाठी एप्रिल-२०१९ पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच या ठिकाणी बोर्इंग-७८७ च्या जेनएक्स इंजिनची टेस्टिंग सुरू करण्यात येईल. एआसईएसएलच्या अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ते सहा इंजिनच्या टेस्टिंगनंतर जीई कंपनी एअर इंडिया एमआरओला व्यवसाय देणे सुरू करेल. जीई इंजिनचे सुटे भाग येथे पाठविणार आहे. त्यानंतर इंजिन तयार होतील आणि टेस्टिंग व ओव्हरहॉल होईल.
हँगर निर्मितीचे काम संथ
एमआरओमध्ये दुसऱ्या टेस्ट सेलच्या हँगरचे कामाची गती संथ आहे. हे काम फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता हे काम एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकच्या (जीई) भागीदारीत टेस्ट हाऊसचे बांधकाम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.