परिवहन मंत्र्यांच्या नावे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र

By admin | Published: August 5, 2016 03:03 AM2016-08-05T03:03:59+5:302016-08-05T03:03:59+5:30

वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असे एकही साहित्य नाही. ना डोळ्याची तपासणी, ना कानाची, ना अपंग असल्याची, तरीही ...

Bogas medical certificate in the name of Transport Minister | परिवहन मंत्र्यांच्या नावे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र

परिवहन मंत्र्यांच्या नावे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र

Next

पैसे देताच ना तपासणी, ना चाचपणी : आरटीओतील भोंगळ कारभार

सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर नागपूर

वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असे एकही साहित्य नाही. ना डोळ्याची तपासणी, ना कानाची, ना अपंग असल्याची, तरीही चालक वैद्यकीयदृष्ट्या फिट असल्याचे प्रमाणपत्र नागपूरच्या शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) मुख्य द्वाराजवळील टपरीवर मिळते. रस्त्यावर धावणाऱ्या लाखो लोकांचा जीव हाती असणारा चालक सक्षम असल्याचा दाखला देण्याची ही पद्धत जीवघेणी ठरत आहे. ‘लोकमत’चमूने गुरुवारी स्टींग आॅपरेशन करीत या गोरखधंद्याचा भंडाफोड केला. याच खात्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या तथाकथित डॉक्टरांकडे अर्ज केला. अर्ज करताच संबंधित डॉक्टरने किस न पाडता थेट पैसे घेतले व डोळे मिटून दिवाकर रावते हे ‘फिट’ असल्याचे प्रमाणपत्र दिले.



वयाची चाळीशी गाठलेल्यांना वाहन परवाना काढताना, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढताना किंवा वाहन परवानाचे नूतनीकरण करून घेतांना संबंधित चालक हा शारिरीक दृष्टीने सुदृढ ‘फिट’ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्याचा नियम आहे. या प्रमाणपत्राशिवाय आरटीओ परवाना देत नाही. पूर्वी हा परवाना अ‍ॅलोपॅथीसह, होमिओपॅथी, युनानी व आयुर्वेदिक डॉक्टर द्यायचे. तीन वर्षांपूर्वी याला विरोध झाल्याने शासनाने केवळ अ‍ॅलोपॅथीच्याच डॉक्टरांचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जाईल, असे निर्देश दिले. मात्र याचा फारसा परिणाम राज्यभरातील आरटीओसमोर टपरीवर बसून वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या तथाकथित डॉक्टरांवर झालेला नाही.


आरटीओच्या परिसरातच गोरखधंदा

आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच बसणारे हे डॉक्टर बोगस तर नाही ना, याची साधी शंकाही आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतली नाही. या दोन्ही कार्यालयात रोज २०० हून अधिक परवान्यांसाठी हे बोगस प्रमाणपत्र दिले जाते. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत ही ‘ओपीडी’ सुरू असते. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे, मात्र कोणत्याही आरटीओ अधिकाऱ्याने या संदर्भात हरकत घेतलेली नाही.

वैद्यकीय प्रमाणपत्र का आवश्यक

वाहन परवाना देताना चालक हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा, असा नियम आहे. हे सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. अर्जदार चालक हा अपंग तर नाही ना, याची तपासणी करीत त्याच्या डोळ्याची आणि कानाची तपासणी प्राधान्याने करावी लागते. यासाठी संबंधित तज्ज्ञांची आवश्यकता असते, मात्र आरटीओसमोरील या डॉक्टरांच्या टपरीवर आवश्यक कोणतेही साधन नाही. कान, डोळे तपासणीतील तज्ज्ञ ही तर फार दूरची गोष्ट आहे.

पैसे द्या, कशाला हवा अर्जदार

याच कार्यालयाच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमण केलेल्या एका टपरीवर एक डॉक्टर खुर्ची टाकून बसला होता. त्याच्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी लागणारे कुठलेही साहित्य नव्हते. केवळ पेन व शिक्क्यांच्या भरवशावर भराभर ‘फॉर्म १-ए’ वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करीत होता. या डॉक्टरसमोर दिवाकर रावते यांचा अर्ज धरत अर्जदाराला बोलावू का, असा प्रश्न केला. यावर त्या डॉक्टरने त्याची काय गरज, ५० रुपये आहे काय, असा उलट प्रश्न विचारला. पैसे दिल्यावर, त्याने अर्ज नीट भरलेला आहे का ते पाहिले.

वडिलाचे नाव लिहिले नसल्याचे सांगून ते विचारत स्वत:च लिहिले तसेच ‘आयडेंटीफिकेशन मार्क्स’चुकीचे लिहिल्याचे सांगून त्यात दुरुस्ती केली. नंतर फोटोवर स्वाक्षरी करीत शिक्का मारून प्रमाणपत्र दिले.



दलालानेच दिले डॉक्टरचे प्रमाणपत्र

नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाच्या शुल्क भरण्याच्या खिडकीजवळच एका दलालाने टेबल खुर्ची टाकून ‘क्या काम है साहब’ विचारत होता. याला डॉक्टर कुठे बसतो, असे विचारल्यावर मीच डॉक्टर आहे असे सांगितले. त्याने फोटो मागून घेतला. त्याला रावते यांचा फोटो व त्यांच्या संदर्भातील माहिती दिली. त्यांने स्वत:च ‘फॉर्म १-ए’ भरला. फोटोही चिकटवित दोन मिनिटे थांबा असे सांगत तो कुठेतरी गेला आणि प्रमाणपत्र घेऊन आला. याचे त्याने १०० रुपये घेतले. त्याला डॉक्टर कुठे आहे असे विचारल्यावर दूरुनच त्यांच्याकडे बोट दाखविले.



असे केले स्टिंग आॅपरेशन

केवळ २० रुपयांत मिळाले प्रमाणपत्र
‘फॉर्म १-ए’ हा आरटीओशी संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुना आहे. ‘लोकमत चमूने’ शहर आरटीओ कार्यालयातून हा अर्ज घेतला. या अर्जावर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे नाव लिहून तो संपूर्ण भरला. फोटोच्या रकान्यात रावते यांचा फोटो चिकटविला. हा अर्ज शहर आरटीओ कार्यालयासमोरील नाल्याच्या पुलावर उभ्या असलेल्या डॉक्टरला दिला. या डॉक्टरने अर्जदार कुठे आहे, अर्ज कशासाठी हवा आहे या प्रश्नांच्या भानगडीत न पडता थेट फोटोवर स्वाक्षरी करीत शिक्का लावला आणि २० रुपये झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्याच्याकडील शिक्क्यावर डॉक्टरचे नाव, पदवी किंवा रजिस्टर नंबरही नीट दिसत नव्हते. परंतु पैसे कमी घेत असल्याने हा एकटा डॉक्टर रोज १०० वर वैद्यकीय प्रमाणपत्र देत असल्याची माहिती आहे.
 

Web Title: Bogas medical certificate in the name of Transport Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.