युजीसीच्या नावाने बोगस परिपत्रक व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:08 AM2021-05-20T04:08:59+5:302021-05-20T04:08:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून कुठल्याही अभ्यासक्रमाची परीक्षा रद्द करण्यात येणार नाही, असे परीक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून कुठल्याही अभ्यासक्रमाची परीक्षा रद्द करण्यात येणार नाही, असे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नावाने परीक्षांसंदर्भात बोगस परिपत्रक व्हायरल होत आहे. यानुसार युजीसीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील सर्व विद्यापीठांना परीक्षा रद्द करण्याचे निर्देश दिल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु परीक्षा व मूल्यमापन संचालकांनी याबाबत विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लेटरहेड यात दिसत असल्याने विद्यार्थ्यांनी यावर विश्वास ठेवला होता. महाविद्यालयांना देखील याबाबत विचारणा होत होती. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क केल्यानंतर खरी बाब समोर आली. संबंधित परिपत्रक व व्हायरल पोस्ट चुकीची आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. विद्यापीठाच्या परीक्षा होतीलच, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयोगाने दिला कारवाईचा इशारा
संबंधित पोस्टमध्ये परिपत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लेटरहेडवर असल्यामुळे त्याची चाचपणी करण्यात आली. तेव्हा खरी बाब समोर आली. आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी एक सूचना जारी केली आहे. संबंधित परिपत्रक फेक असल्याचे त्यांनीदेखील सांगितले. आयोगाने असा कुठलाही निर्णय घेतला नसून दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. लेटरहेडच्या माध्यमातून फेक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.