Nagpur | फुकट दारू मिळविण्यासाठी बोगस पत्रकाराकडून गोंधळ; सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 02:19 PM2022-10-08T14:19:10+5:302022-10-08T14:20:13+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांनाही धमकी
नागपूर : फुकटच्या दारूसाठी गोंधळ घालत बारचालकाकडून आठवडाभराची खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कथित पत्रकाराने बारमध्ये गोंधळ घालण्याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावले. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने सदरमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फारिस कादरी, असे आरोपीचे नाव आहे.
फारिस स्वत:ची ओळख यूट्युबर व पत्रकार अशी सांगतो. पोलीस अधिकारी आणि प्रसिद्ध लोकांची चर्चा व्हायरल करून तो अनेकदा चर्चेत आला आहे. ६८ वर्षीय सोहनसिंग वाधवा यांचे सदर येथील माउंट रोडवर बार आणि रेस्टॉरंट आहे. वाधवा यांच्या तक्रारीनुसार, फारिसने पत्रकार म्हणून चार-पाच वेळा फुकट दारू मागितली. पैसे मागितल्यावर शहरातील मोठ्या लोकांशी ओळखी असल्याची बतावणी करून तो धमकी द्यायचा. गुरुवारी मध्यरात्री त्याने फुटक दारू मागितली. वेटरने एकदा दारू दिल्यानंतर त्याने परत फुकट दारू मागितली. वेटरने नकार दिल्यावर 'तुम्ही बेकायदेशीर बार चालवता, पाच हजार रुपये द्या, अन्यथा महापालिका आणि अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून बार बंद करून देईन. माझी मोठ्या गुंडांशी संबंध आहे. मी कधीही तुमचा जीव घेईल व कोणताही पुरावा ठेवणार नाही,' अशी धमकी त्याने द्यायला सुरुवात केली. घाबरून वाधवाने त्याला दोन हजार रुपये दिले.
काही वेळाने फारीस पुन्हा आला आणि रॉडने बारचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. तिथे ठेवलेल्या वस्तू फेकून दिल्या. शिवीगाळ करत १० हजार रुपये व दारूची मागणी करू लागला. काही अनुचित प्रकार घडण्याची भीती आणि बार बंद असल्याने वाधवा यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर फारीस सदरच्या पेट्रोल पंपावर पोहोचला. तेथे त्याने गस्तीवर असलेल्या एका दुचाकीस्वार पोलिसाला थांबवले. शिवीगाळ करत पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. यादरम्यान कोणीतरी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ बनवला. वाधवा यांनी शुक्रवारी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी फारीसविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.