मंत्रालयातील बोगस नोकर भरती रॅकेटची चौकशी होणार; ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते रॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 06:07 AM2022-12-31T06:07:20+5:302022-12-31T06:08:14+5:30
लाखो रुपये उकळले, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार: देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:मंत्रालयातील शिपायाने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस नोकर भरती रॅकेट चालवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. ‘लोकमत’ने हे रॅकेट उघडकीस आणले होते. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली.
मंत्रालयातील एका शिपायाने आपण सचिवपदावर कार्यरत असल्याचे सांगत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून १२ बेरोजगार तरुणांना फसवल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. वेगवेगळी कारणे पुढे करून या बेरोजगार तरुणांकडून ७४ लाख रुपये उकळण्यात आले.
विशेष म्हणजे, या सर्वांची मुलाखत मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात घेण्यात आली. ही बाब गभीर असून, याप्रकरणी शासनाने कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली.
मंत्रालयातच घेतली बोगस मुलाखत
- मालाड येथे राहणाऱ्या एका तरुणाची ओळख महेंद्र सकपाळ नावाच्या व्यक्तीसोबत झाली. हा तरुण स्वतःसाठी आणि त्याच्या दोन भावंडांसाठी नोकरीच्या शोधात असल्याचे सकपाळ यांना समजले. त्यांनी आपल्या परिचयातील नितीन साठे हे सामान्य प्रशासन विभागात सचिवपदावर कार्यरत असून, त्यांना सांगून नोकरीसाठी प्रयत्न करता येईल, असे या तरुणाला सांगितले.
- या तरुणाने सुरुवातीला नऊ लाख रुपये सकपाळ यांना दिले. छायाचित्र, आधार कार्ड तसेच इतर सर्व कागदपत्रे या तिघांनी सकपाळ यांच्याकडे दिली.
- त्यानंतर या तरुणांची मंत्रालयात मुलाखत घेण्यात आली. जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. हे बोगस नोकरभरती रॅकेट असल्याने ‘लोकमत’ने समोर आणले होते.
- ‘लोकमत’ने २० डिसेंबरच्या अंकात याबाबतचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला होता. यातील सर्व मुद्द्यांचा उहापोह सभागृहातील चर्चेत झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"