बोगस नोकर भरती : देशाभरातील बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:01 PM2019-08-27T22:01:09+5:302019-08-27T22:03:31+5:30

बोगस नोकर भरतीचे रॅकेट चालवून देशातील अनेक तरुणांकडून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली आहे.

Bogus recruitment:crores of unemployed people across the country cheated | बोगस नोकर भरती : देशाभरातील बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा

बोगस नोकर भरती : देशाभरातील बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा

Next
ठळक मुद्देरॅकेट चालविणारी टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस नोकर भरतीचे रॅकेट चालवून देशातील अनेक तरुणांकडून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली आहे.
केंद्रातील लेबर वेल्फेअर मिनिस्ट्री तर कधी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स नवी दिल्लीत कार्यरत असल्याचे सांगून बेरोजगार तरुणांना फसवविणाऱ्या निकिता मेश्राम, सुमित मेश्राम, राज यादव ऊर्फ ओमवीरसिंग आणि धीर खुराणा या आरोपींच्या बनवेगिरीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना गुन्ह्यांची एक साखळी आणि गुन्हेगारांची आंतरराज्यीय टोळी हाती लागली.
आरोपी निकिता सुमित मेश्राम (वय २९) ही जरीपटक्यातील बेझनबागेत राहते. ती लेबर वेल्फेअर सेक्शन ऑफिसर (मिनिस्ट्री ऑफ लेबर अ‍ॅण्ड एम्प्लॉयमेंट, न्यू दिल्ली) म्हणून स्वत:ची ओळख देते. तिने निखिल दत्तूजी ठाकरे याला रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. निकिताने आपले बनावट ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी धीर खुराणाची ओळख करून दिली. खुराणा हा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स न्यू दिल्लीला एडीजी असल्याची थाप निकिताने मारली. आम्ही कुणालाही रेल्वे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय डाक विभाग, आरोग्य विभागात नोकरी लावून देतो, असे ती म्हणाली. त्यावर विश्वास ठेवून ठाकरेने तिला नोकरीसाठी ठरलेल्या रकमेपैकी ६० हजार रुपये दिले. गणेशपेठमधील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही रक्कम घेऊन निकिताने ठाकरेकडून त्याची शैक्षणिक कागदपत्रे घेतली आणि त्याला बनावट प्रशिक्षण तसेच नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर ११ लाख ५० हजार रुपये घेतले. नोकरी मिळाल्याच्या आनंदात ठाकरे रेल्वे अधिकाऱ्याकडे नियुक्तीपत्र घेऊन गेला तेव्हा त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अनेक राज्यात नेटवर्क
बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम हडपणारी ही टोळी २०१५ पासून कार्यरत असल्याचे पोलीस सांगतात. या टोळीचे नेटवर्क महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्येही असल्याचे उघडकीस आले असून, त्यांनी या सर्व राज्यातील बेरोजगारांची फसवणूक करून कोट्यवधी रुपये हडपल्याचेही आरोपींच्या ताब्यातील रेकॉर्ड तसेच मोबाईलच्या सीडीआरवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, फरार असलेल्यापैकी मिलिंद दिवाकर मेश्रामच्या १८ ऑगस्टला पोलिसांनी मुसक्या बांधल्या. तर गणेश दत्तात्रय देशमुख (वय २९, रा. स्वराजनगर, गोडोली, सातारा) आणि राजेश भानुसदास भारसकर (वय ३२, रा, न्यू तापडियानगर, मिश्रा ले-आऊट, अकोला) यालाही गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक कार आणि सोनसाखळी तसेच दुचाकी आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली.

२९ पीडितांची पोलिसांकडे धाव
या टोळीच्या जाळ्यात अडकून लाखो रुपये गमावणाऱ्या २९ जणांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यापैकी खेमराज अंकुश कठाणे, श्वेता नरेंद्र दुबे, दीपक भास्कर ढोंगे, पुरुषोत्तम नामदेव बगमारे, रमाकांत केवलराम बगमारे, दिनकर आसाराम मिसार आणि अभिजित लक्ष्मण माने या सात जणांनी उपरोक्त आरोपींकडे ५९ लाख रुपये दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फसवणूक झालेल्यांचा आणि आरोपींनी हडपलेल्या रकमेचा आकडा कितीतरी अधिक पट मोठा असल्याचेही अधिकारी सांगतात. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त राजरत्न बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. कुमरे, हवालदार निशिकांत सचिन, नितीन, रमेश आणि शिपाई पिंकी यांच्या पथकांनी उपरोक्त आरोपींच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावली आहे.

Web Title: Bogus recruitment:crores of unemployed people across the country cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.