शिक्षणाचा खेळखंडोबा! चक्क बनावट शाळा उघडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

By योगेश पांडे | Published: December 5, 2022 01:42 PM2022-12-05T13:42:32+5:302022-12-05T13:47:58+5:30

मूळ शाळेचे बनावट दाखले : शाळेतील गैरप्रकार पोहोचला पोलिस ठाण्यात

Bogus schools opened and students were given fake school certificates; shocked in education circles in Nagpur | शिक्षणाचा खेळखंडोबा! चक्क बनावट शाळा उघडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

शिक्षणाचा खेळखंडोबा! चक्क बनावट शाळा उघडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

googlenewsNext

नागपूर :शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रालादेखील भ्रष्टाचाराची वाळवी लागली असून एका शाळेच्या पदाधिकाऱ्याने चक्क विद्यार्थ्यांच्या भविष्याशीच खेळण्याचा प्रकार केला आहे. कुठलीही परवानगी न घेता मूळ शाळेच्या नावाशी मिळतीजुळती बनावट खासगी शाळा उघडून अगोदर विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करण्यात आली. त्यानंतर मुलांना मूळ शाळेचे बनावट दाखले देण्यात आले. हा गैरप्रकार समोर आल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यासह तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे शालेय शिक्षण वर्तुळात तर खळबळ माजलीच आहे. शिवाय पोलिसदेखील थक्क झाले आहेत.

वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दवलामेटी येथे श्री साईनाथ कॉन्व्हेंट असून तेथे अमरेंद्रकुमार चंचलकडे प्रशासकीय कामाची जबाबदारी होती. संबंधित संस्थेत रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असतानाच चंचलने जुना कामठी मार्गावर शाळेच्या नावाशी मिळतीजुळती श्री साई कॉन्व्हेंट उघडली. त्यांनी याची कुठलीही माहिती शाळेच्या संस्थेला दिली नव्हती. तसेच कोणत्याही शासकीय संस्थेची परवानगी घेतली नाही. श्री साईनाथ कॉन्व्हेंटची ब्रांच असल्याचे चंचलने स्वत:च्या शाळेत मुलांचे प्रवेशदेखील करवून घेतले. परंतु शाळा जास्त काळ टिकू शकली नाही व ती बंद करावी लागली.

पालकांनी चंचलकडे ‘टीसी’साठी तगादा लावला. चंचलने श्री साईनाथ कॉन्व्हेंट येथील क्लर्क मोहिनी बहादुरे व तत्कालीन मुख्याध्यापिका रश्मी वऱ्हाडपांडे यांच्या सहकार्याने २२ मुलांच्या बनावट ‘टीसी’ तयार केल्या व त्या पालकांना दिल्या. त्यांच्यावर शाळेचा शिक्कादेखील होता. परंतु टीसीवर प्रवेशाच्या क्रमांक, टीसी क्रमांक यांची नोंद नव्हती. यासंदर्भात शाळेकडे विचारणा झाल्यावर हा गैरप्रकार उघडकीस आला. शाळेने अंतर्गत चौकशीनंतर चंचलला कार्यमुक्त केले. मुख्याध्यापक रवींद्र पाखरे यांनी यासंदर्भात वाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चंचल, बहादुरे व वऱ्हाडपांडे यांच्याविरोधात फसवणुकीसह भादंविच्या ३४, ४६६, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गटशिक्षणाधिकारी कार्यालयामुळे उघडकीस आला बनाव

अंदाजे दोन महिन्यांअगोदर गट शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, नागपूर येथील केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी विचारणा केल्यानंतर हा बनाव उघडकीस आला. त्यांनी मुख्याध्यापकांना फोन करून श्री साईनाथ कन्व्हेंटच्या नावावर काही विद्यार्थ्यांना टीसी मिळाल्या आहेत. मात्र त्यावर विद्यार्थ्यांचा स्टुडंट क्रमांक व दाखल क्रमांक नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शाळेत प्रवेश घेण्यासाठी अडचण होत आहे असे सांगितले. तसेच टीसी बनावट असल्याचे दिसून येत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. यानंतर शाळेकडून चौकशीची सूत्रे हालली. दस्तावेजांची पडताळणी केल्यानंतर हा गैरप्रकार समोर आला.

Web Title: Bogus schools opened and students were given fake school certificates; shocked in education circles in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.