मध्य प्रदेशातील बोगस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:00 AM2019-05-25T00:00:27+5:302019-05-25T00:01:43+5:30
खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.
यात कापसाच्या बियाण्यांच्या आठ जाती होत्या. ईश्वर साळवे हा एमएच४० एसी ३६४७ या वाहनाने मध्य प्रदेशातून नागपूरला येत होता. दरम्यान निगराणी पथकाच्या लक्षात येताच त्याच्या वाहनांची तपासणी केली. यात अनाधिकृत, बेकायदेशीर, विनापरवाना असलेले बियाणे आढळले. ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे हे बियाणे होते. कृषी विभागाच्या भरारी पथकाने पंचनामा करून त्याच्या विरुद्ध केळवद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या कारवाईत कृषी अधिकारी प्रवीण देशमुख, तंत्र अधिकारी व विभागीय गुण नियंत्रक संदीप पवार, पं.स. उमरेडचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे व पं.स. उमरेडचे कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे सहभागी होते. या कारवाईत केळवद पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी.एम. गोंदवे यांचेही सहकार्य लाभले. ईश्वर साळवे हे मध्य प्रदेशातून बोगस बियाण्यांची खरेदी करून नागपुरात विक्री करीत होते. हंगामाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी परवानाधारकांकडून करावी व त्याची पावती व काही बियाणे संग्रही करून ठेवावे, जेणेकरून त्याचा मोबदला शेतकºयांना मिळण्यास मदत होईल, असे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांनी सांगितले.