नागपुरात बोगस वाहतूक पोलिसाला वसुली करताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:40 PM2019-06-27T22:40:42+5:302019-06-27T22:41:36+5:30
लकडगंज येथील गंगा-जमुना रोडवर बुधवारी दुपारी एका बोगस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास वाहन चालकांकडून वसुली करीत असताना पकडण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांच्या गणवेशात बोगस पोलीस सक्रिय असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंज येथील गंगा-जमुना रोडवर बुधवारी दुपारी एका बोगस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास वाहन चालकांकडून वसुली करीत असताना पकडण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांच्या गणवेशात बोगस पोलीस सक्रिय असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
दिलीप उद्धवराव टापरे (३२) रा. गाडगेबाबानगर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप याच्याकडून पोलिसांनी बोगस ओळखपत्र, रोख २६०० रुपये आणि एमएच/डी.डब्ल्यू./२६११ या क्रमांकाची बाईक जप्त केली. बोगस पोलीस कर्मचारी बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गंगा-जमुना रोडवर बालाजी मंदिरजवळ लांबट ट्रान्सपोर्टसमोर वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून वसुली करीत होता. त्यावेळी एएसआय वसंता कणकदळे हे तेथून जात होते. वाहने थांबवणारा पोलीस कर्मचारी विभागाचा नसल्याचा त्यांंना संशय आला. त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्याचे बिंग फुटले. एएसआय कणकदळे यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.