नागपुरात बॉम्ब फुटले आणि रॉकेटही उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:10 AM2018-11-09T01:10:43+5:302018-11-09T01:14:09+5:30
रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांनी रात्री १० नंतरही फटाके फोडून दिवाळी साजरी केली. न्यायालयाने घातलेले वेळेचे बंधन झुगारून बॉम्बही फुटले आणि रॉकेटही उडाले. देशाच्या कानाकोपऱ्यात फटाक्यांचे आवाज घुमले आणि प्रचंड आतषबाजीने आसमंत उजळून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांनी रात्री १० नंतरही फटाके फोडून दिवाळी साजरी केली. न्यायालयाने घातलेले वेळेचे बंधन झुगारून बॉम्बही फुटले आणि रॉकेटही उडाले. देशाच्या कानाकोपऱ्यात फटाक्यांचे आवाज घुमले आणि प्रचंड आतषबाजीने आसमंत उजळून गेला.
प्रदूषण न पसरवणारे फटाके रात्री ८ ते १०च्या दरम्यानच फोडा, असा न्यायालयाचा आदेश होता. या बंधनामुळे दिवाळी साजरी करायची कशी, अशी चर्चा लोकांमध्ये होती. मात्र देशभरात दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली. न्यायालयाने दिलेल्या वेळेच्या आधी आणि नंतरही फटाके फुटले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दिवाळी साजरी केली. १२५ डेसिबल्स आवाजाच्या मर्यादेला फटाक्यांनी सुरुंग लावले.
पोलिसांची गस्त आणि मार्गदर्शन
सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडावेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने नजर ठेवावी, असे निर्देश नुकतेच दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करता यावी म्हणून राज्यभर पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक ठाण्यांतर्गत पोलिसांच्या गाड्या फिरून माईकवरून नागरिकांना रात्री १० नंतर फटाके फोडू नका, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नका, असे निर्देश देत होते. पोलिसांना सर्वच ठिकाणी ग्रस्त घालणे शक्य नव्हते. रात्री १०नंतरही फटाक्यांचे आवाज येत होते. मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांचे आवाज सुरूच होते.
फटाका विक्रीला फटका
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा परिणाम यंदा फटाके विक्रीवर झाला. एकीकडे फटाक्यांचे भाव २० टक्क्यांनी वाढले तर दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशामुळे यंदा फटाके विक्री २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. जीएसटीचा विक्रीवर परिणाम झाला. जीएसटीमुळे फटाक्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. यंदा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना जास्त मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले.
चिनी फटाक्यांची विक्री
चिनी फटाक्यांवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याची माहिती आहे. लहान मुलांमध्ये प्रचलित असलेल्या पॉपपॉप फटाक्यांना मोठी मागणी होती. छोटासा बॉम्ब जमिनीवर आदळ्यानंतर फुटतो. शिवाय या बॉम्बचे पावडर पॅकेजमध्ये विक्री करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. चिनी फटाके आरोग्याला हानीकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. या फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरलेला कच्चा माल मानवी आरोग्यास घातक ठरणारा आहे. फटाक्यांच्या धुराने केवळ प्रदूषणच नव्हे, तर अंधत्व येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.