रेल्वेस्थानकावर बॅगमध्ये आढळला बॉम्ब! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:16+5:302021-06-29T04:07:16+5:30

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवर एका बॅगमध्ये बॉम्ब आढळला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. पाहता पाहता ...

Bomb found in a bag at the train station! () | रेल्वेस्थानकावर बॅगमध्ये आढळला बॉम्ब! ()

रेल्वेस्थानकावर बॅगमध्ये आढळला बॉम्ब! ()

Next

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवर एका बॅगमध्ये बॉम्ब आढळला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आरपीएफच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसर सीलबंद केला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने श्वानाच्या मदतीने तपासणी केली. शेवटी ही मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

रेल्वेत दुर्घटना किंवा काही संकट निर्माण झाल्यास आरपीएफ किती वेळात घटनास्थळी पोहोचते, आरपीएफचे जवान सतर्क आहेत की नाही, याची चाचपणी करण्यासाठी आरपीएफने सोमवारी मॉकड्रील घेतली. मात्र, संपूर्ण बाब गुप्त ठेवण्यात आली. मॉकड्रीलनुसार सोमवारी दुपारी २.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक एकवरील मुंबई एण्डकडील भागात एक बेवारस बॅग आढळली. बऱ्याच वेळापासून या बॅगजवळ एकही प्रवासी न आल्यामुळे या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता आरपीएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. सर्वप्रथम घटनास्थळाचा संपूर्ण ताबा पथकाने घेऊन परिसर सील करण्यात आला. त्यापूर्वी बीडीडीएस आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथक आल्यानंतर श्वानाच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. श्वानाने कुठलाही इशारा न केल्यामुळे बीडीडीएस पथकाने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये कपडे असल्याचे आढळले. अखेर रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना ही मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला. सुरक्षेची चाचपणी करण्यासाठी आयोजित ही मॉकड्रील यशस्वी झाली. ही मॉकड्रील मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली.

..........

Web Title: Bomb found in a bag at the train station! ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.