रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा
By admin | Published: July 21, 2016 01:58 AM2016-07-21T01:58:20+5:302016-07-21T01:58:20+5:30
मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुढील भागात पांढऱ्या रंगाच्या पोत्यात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली...
‘बीडीडीएस’कडून तपासणी : तीन तास पोते बेवारस
नागपूर : मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुढील भागात पांढऱ्या रंगाच्या पोत्यात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केल्यानंतर सर्वांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला.
ही घटना आज, बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. पुढच्या महिन्यात स्वातंत्र्यदिन आहे. अशास्थितीत लोहमार्ग पोलीस, आरपीएफने सतर्क राहणे गरजेचे आहे. परंतु बेवारस पोते पडून असल्याची बाब मध्य रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी लक्षात आणून देऊनही लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने त्याकडे दुर्लक्ष केले. रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात दुपारी ३ वाजेपासून एक पांढऱ्या रंगाचे पोते बेवारस स्थितीत पडून होते. याच भागात कुली बसलेले असतात. बेवारस पोते दिसल्यानंतर त्यांनी बराच वेळ वाट बघितली. परंतु त्यावर कोणीच हक्क न सांगितल्यामुळे त्यांना संशय आला. अब्दुल मजीद यांनी सुरुवातीला मेनगेटवर ड्युटीला असलेल्या एका आरपीएफ जवानास ही बाब सांगितली. परंतु त्याने लोहमार्ग पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीवर सूचना दिली असता त्यांनी आरपीएफकडे बोट दाखविले. अखेर बॉम्ब शोधक व नाशक पथक तेथे उपस्थित असल्यामुळे त्यांना सूचना दिल्यानंतर या पोत्याची श्वान पथकाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. परंतु पोत्यात काहीच न आढळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोत्यात काहीच नसल्याचे समजताच पोते उघडे करून पाहिले असता त्यात मिठाईचे रिकामे बॉक्स आढळले. यावेळी बीडीडीएस पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक धम्मदीप इंगळे, पोलीस हवालदार मनोज गुप्ता, धीरज पाली, ऋषी राखुंडे, राहुल सेलोटे आणि श्वान रॉनी यांनी तपासणी केली.(प्रतिनिधी)