एसीएफच्या नावाने बोगस ‘हॅमर’
By admin | Published: July 26, 2016 02:20 AM2016-07-26T02:20:19+5:302016-07-26T02:20:19+5:30
एका खासगी ठेकेदाराने चक्क नागपूर वन विभागातील एका सहायक वनसंरक्षक (एसीएफ) अधिकाऱ्याच्या नावे बोगस..
गुन्हा दाखल करण्याचे निर्देश : कोट्यवधीच्या सागवानाची अवैध कटाई
जीवन रामावत नागपूर
एका खासगी ठेकेदाराने चक्क नागपूर वन विभागातील एका सहायक वनसंरक्षक (एसीएफ) अधिकाऱ्याच्या नावे बोगस ‘हॅमर’ तयार करून कोट्यवधीच्या सागवान लाकडाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मात्र असे असताना संबंधित ठेकेदार अजूनही खुलेआम मोकाट फिरत आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की, मागील डिसेंबर २०१५ मध्ये नागपूर वन विभागाच्या हिवरा राऊंडमधील वरघाट बिटातील मौजा सवेंद्री सर्वे क्र. ७८ येथील ५२ सागाच्या झाडांची अवैध कटाई झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्याआधारे नागपूरच्या तत्कालीन उपवनसंरक्षक ज्योयतो बॅनर्जी यांनी सहायक वनसंरक्षक वीरसेन यांच्यावर या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी दिली होती. परंतु वीरसेन यांची लगेच वनभवन येथे बदली झाली. त्यामुळे ती चौकशी विभागीय वन अधिकारी (दक्षता) केवल डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आली. यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली.
दरम्यान,त्यांना एका खासगी ठेकेदाराने सोनवणे नावाच्या शेतकऱ्याकडून सागाची झाडे खरेदी करून, त्यांची विनापरवानगी अवैध कटाई केल्याचे निदर्शनास आले.
वन विभागाने केला ‘हॅमर’ जप्त
नागपूर : तसेच त्या सर्व झाडांवर सहायक वनसंरक्षक राठोड यांचा ‘हॅमर’ आढळून आला. शिवाय संबंधित ठेकेदाराने वन विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती अवैध सागवान कटाई केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले होते. त्यानुसार डोंगरे यांनी आपला चौकशी अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला.
त्याआधारे तत्कालीन पवनी येथील वनपाल फुले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते. तसेच एसीएफ राठोड व वन परिक्षेत्र अधिकारी कहलुके यांच्यावरही गंभीर ठपका ठेवण्यात आला होता. तसेच तो ‘हॅमर’ जप्त करून त्याला परीक्षणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. वन अधिकाऱ्यांच्या मते, अलीकडेच त्या ‘हॅमर’चा अहवाल नागपूर वन विभागाकडे प्राप्त झाला असून, तो ‘हॅमर’ सहायक वनसंरक्षक राठोड यांचा नव्हताच, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागपूर वन विभागाने आता संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालाचाली सुरू करून त्यासंबंधी निर्देशही जारी केले असल्याची माहिती एका वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्या निर्देशासंबंधी पवनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी कहलुके यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता, त्यांनी अजूनपर्यंत आपल्याकडे असे कोणतेही निर्देश प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून नागपूर वन विभाग संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालून त्याचा बचाव करीत असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)
अद्यापही ठेकेदार मोकाट का?
माहिती सूत्रानुसार नागपूर वन विभागाला सुमारे १५ दिवसांपूर्वी त्या ‘हॅमर’चा अहवाल प्राप्त झाला आहे. शिवाय नागपूर वन विभाग संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंबंधी निर्देश जारी केले असल्याचे सांगत आहे. परंतु प्रत्यक्षात अजूनपर्यंत संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसून, ठेकेदार हा मोकाट फिरत आहे. यावरून नागपूर वन विभाग हा बनवाबनवी करून, संबंधित ठेकेदाराची पाठराखण करीत आहे. वन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला अटक झाल्यास या प्रकरणातील फार मोठे घबाड बाहेर येणार आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने तोंड उघडल्यास अनेक वन अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा गजाआड होऊ शकतात. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचा बचाव केला जात आहे.