नागपूर विभागात विद्यार्थ्यांवर बरसले ‘बोनस’ गुण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:36 AM2018-06-09T01:36:25+5:302018-06-09T01:36:36+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झालेला दिसून आला. यामुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना चक्क ९९ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले तर बऱ्याच जणांनी तर ९८ टक्क्यांहून अधिक मजल मारली. शहरातील सुमारे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले. ‘मान्सून’च्या सुरुवातीला झालेल्या या गुणांच्या पावसामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झालेला दिसून आला. यामुळे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना चक्क ९९ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले तर बऱ्याच जणांनी तर ९८ टक्क्यांहून अधिक मजल मारली. शहरातील सुमारे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले. ‘मान्सून’च्या सुरुवातीला झालेल्या या गुणांच्या पावसामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यंदाही उत्तीर्णांच्या उपराजधानीत विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. जर विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणांविना टक्केवारी लक्षात घेतली तर सोमलवार हायस्कूल रामदासपेठ येथील केतकी राजूरकर व प्रणाली तितरे यांनी ९८.६० टक्के (४९३) गुण मिळवित प्रथम स्थान पटकाविले. तर सोमलवार हायस्कूल, खामला येथील विद्यार्थिनी शंकरी खोकले हिने ९८.४० टक्के (४९२) गुण प्राप्त करत दुसरे स्थान मिळविले. सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ येथील संयुक्ता मन्सुरे, सृष्टी आंबुलकर व पं.बच्छराज व्यास महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास चुटे हे प्रत्येकी ९८.२० टक्के (४९१) गुणांसह तृतीय क्रमांकावर आले.
नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,८८२ पैकी २७,७५५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८९.८७ टक्के इतके आहे. तर जिल्ह्यातून ८२.८६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८६.२९ टक्के इतका राहिला. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल १.४७ टक्क्यांनी वाढला.
शहरात ८६ टक्क्यांहून अधिक उत्तीर्ण
नागपूर शहरात १८,२१६ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १६,३२७ म्हणजेच ८९.६२ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. तर १८,५८० पैकी १५,४२३ (८३.०१ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील एकूण उत्तीर्णांचे प्रमाण हे ८६.२९ टक्के इतके आहे.
टॉपर्स विद्यार्थी
क्रमांक नाव शाळा टक्के
१ केतकी राजूरकर सोमलवार हायस्कूल,रामदासपेठ ९८.६०%
१ प्रणाली तितरे सोमलवार हायस्कूल,रामदासपेठ ९८.६०%
२ शंकरी खोकले सोमलवार हायस्कूल, खामला ९८.४०%
३ संयुक्ता मन्सुरे सोमलवार हायस्कूल,रामदासपेठ ९८.२०%
३ सृष्टी आंबुलकर सोमलवार हायस्कूल,रामदासपेठ ९८.२०%
४ विकास चुटे पं.बच्छराज व्यास विद्यालय ९८.२० %
जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी
सहभागी उत्तीर्ण टक्केवारी
विद्यार्थी ३२,१९० २६,६७२ ८२.८६
विद्यार्थिनी ३०,८८२ २७,७५५ ८९.८७
एकूण ६३,०७२ ५४,४२७ ८६.२९
गुणपडताळणीसाठी १८ जूनपर्यंत अर्ज
यंदापासून निकालाच्या दुसºया दिवशीपासूनच गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिके्च्या स्वसाक्षांकीत प्रतीसह ९ जून ते १८ जून या कालावधीत अर्ज करता येईल तर छायाप्रतीसाठी २८ जूनपर्यंत अर्ज करता येईल. छायाप्रत मिळाल्यापासून ५ दिवसात पूनर्मूल्याकंनासाठी अर्ज करावा लागणार आहे.
सिद्धार्थ उमाठे दिव्यांगांमधून ‘टॉप’
शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बी.आर.ए.मुंडले इंग्लिश मीडियम शाळेचा विद्यार्थी सिद्धार्थ उमाठे हा ९१.२१ टक्के गुणांसह दिव्यांगांमधून विदर्भात प्रथम आला. तर कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी आरती मानमोडे हिने ९०.६० टक्के गुणांसह दुसरा तर भावेश आंबोलीकर याने ८१.६० टक्के गुणांसह तृतीय स्थान पटकाविले.