विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा पुस्तक बाजार संकटात

By admin | Published: January 20, 2017 02:36 AM2017-01-20T02:36:43+5:302017-01-20T02:36:43+5:30

शहरातील ८० वर्षे जुने आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा सीताबर्डी येथील जुन्या पुस्तकांचा बाजार संकटात सापडला आहे.

Book of the future of the students in the book market crisis | विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा पुस्तक बाजार संकटात

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा पुस्तक बाजार संकटात

Next

सीताबर्डीतील जुन्या पुस्तकांचा बाजार हटणार : पुस्तक विक्रेत्यांच्या रोजगारावर टांगती तलवार
नागपूर : शहरातील ८० वर्षे जुने आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा सीताबर्डी येथील जुन्या पुस्तकांचा बाजार संकटात सापडला आहे. मेट्रो रेल्वेच्या स्टेशनमुळे हा बाजार हटविण्यात येणार असल्याने येथील पुस्तक विक्रेत्यांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सीताबर्डी येथील मॉरेस कॉलेज टी पॉर्इंट शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात असलेला जुना पुस्तक बाजार ही शहराची एक ओळख आहे.एनसीआरटीईच्या पुस्तकांपासून तर एमबीबीएस, इंजिनियरिंग, कॉम्प्युटर, पॉलिटेक्निक, एलएलबी आदी विविध अभ्यासक्रमांचे तसेच स्पर्धा परीक्षांची पुस्तके येथे हमखास उपलब्ध होतात. इतकेच नव्हे तर इंग्रजी, हिंदी आणि मराठी साहित्याची पुस्तके सुद्धा येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि साहित्य रसिकांसाठी हा पुस्तक बाजार कित्येक वर्षांपासून आशेचे केंद्र ठरला आहे. विशेषत: गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तर हा महत्त्वाचा बाजार राहिलेला आहे. कारण उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना येथे महागडे पुस्तक अर्ध्या किमतीत उपलब्ध होते. एखाद्या एडिशनचे पुस्तक सबंध शहरात मिळाले नाही तर ते या जुन्या पुस्तकाचा बाजारात हमखास मिळेल, याची खात्री विद्यार्थ्यांना देणारा हा पुस्तक बाजार आहे. अनेक वर्षांपासून येथील विक्रेते या ठिकाणी आपला रोजगार इमानेइतबारे करीत आलेले आहेत. अनेकांनी तर पुस्तक विक्रीचे काम करीत स्वत:ही उच्च शिक्षण घेतले आहे. आता येथे असलेल्या सर्वच विक्रेत्यांचा हा प्रमुख रोजगार आहे. या रोजगारावरच त्यांचे कुटुंबही अवलंबून आहेत. परंतु आता या रोजगारावरच टांगती तलवार आहे.
शहरात मेट्रो रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. झिरो माईल रेल्वे स्टेशनचेही काम जोरावर आहे. या परिसरातच हा बाजार येत असल्याने तो हटविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. हा बाजार केवळ येथील विक्रेत्यांसाठीच नव्हे तर विद्यार्थी व पुस्तकप्रेमींसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या बाजारासंदर्भात शासन व प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

आमच्या रोजगाराचे काय?
आम्ही गेल्या तीन पिढ्यांपासून सीताबर्डी परिसरातच व्यवसाय करीत आहोत. बर्डी हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक जवळ असल्याने दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा परिसर चांगले ठिकाण आहे. त्यामुळे आम्ही या परिसरातच व्यवसाय करीत आलो आहेत. सर्वप्रथम सीताबर्डीचा पूल बांधला गेला. तेव्हा आम्हाला हटविण्यात आले. आता मेट्रो स्टेशनसाठी हटविले जात आहे. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु आमच्या रोजगाराचे काय? तत्कालीन पालकमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आम्ही संस्था रजिस्टर्ड केली. मनपा आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी पुस्तक विक्रेत्यांसाठी गाळे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भातील आराखडा सुद्धा तयार केला होता. परंतु काहीच झाले नाही. आमच्या रोजगाराचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा आहे.
- नरेश वाहाणे
अध्यक्ष, नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था
पुस्तक बाजार शहराची गरज
जुना पुस्तक बाजार हा केवळ एक बाजार नसून विद्यार्थ्यांसाठी त्याचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. जे गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थी महागडे पुस्तक विकत घेऊ शकत नाही. त्यांना हा बाजार अर्ध्या किमतीत पुस्तक उपलब्ध करून देतो. इतकेच नव्हे तर संपूर्ण शहरात चांगल्या मोठ्या पुस्तकालयांमध्ये सुद्धा एखाद्या एडिशनचे बुक सापडले नाही, तर येथे ते हमखास मिळते. त्यामुळे हा पुस्तक बाजार विद्यार्थ्यांची व शहराची गरज आहे.
- अंकुश जोशी,
अभियांत्रिकी विद्याथी

Web Title: Book of the future of the students in the book market crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.