बुकिंग केली उन्हाळ्यात; चारचाकी मिळाली दिवाळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 08:32 PM2022-10-31T20:32:33+5:302022-10-31T20:33:14+5:30
Nagpur News दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन बाजार तेजीत होता. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाल्याचे विविध कंपन्यांच्या विक्रेत्यांनी सांगितले.
नागपूर : यंदा दसरा आणि दिवाळी सण ऑक्टोबर महिन्यात आले. या महिन्यात लोकांनी दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि इलेक्ट्रिक वाहनांची मनमुराद खरेदी केली. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन बाजार तेजीत होता. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाल्याचे विविध कंपन्यांच्या विक्रेत्यांनी सांगितले. पण सेमी कंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे बुकिंग उन्हाळ्यात केलेल्या अनेकांना चारचाकी दिवाळीत मिळाल्याची माहिती आहे.
वाहन बाजार तेजीत
चारचाकी : ऑक्टोबर महिन्यात ३१ पर्यंत आरटीओकडे जवळपास २५९० वाहनांची नोंद झाल्याची माहिती आहे. हा आकडा काही वर्षांतील जास्त आहे.
दुचाकी : ३१ ऑक्टोबरपर्यंत १० हजारांपेक्षा जास्त दुचाकी वाहनांची आरटीओमध्ये नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक विक्री झाली आहे.
इलेक्ट्रिकल वाहने : आता इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकींना प्रचंड मागणी आहे. ही वाहने महाग आहेत. पण सबसिडी असल्यामुळे लोकांना आर्थिक फायदा होत आहे. ऑक्टोबरमध्ये जवळपास २ हजार दुचाकी आणि २०० चारचाकी विकल्याची नोंद आहे.
चारचाकीसाठी सहा-सहा महिने वेटिंग
चारचाकी वाहनांमध्ये लावण्यात येणाऱ्या सेमी कंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे आधी आवडत्या चारचाकी वाहनांसाठी लोकांना सहा-सहा महिने वाट पाहावी लागत होती. पण आता चीपचा तुटवडा कमी होऊ लागल्यामुळे काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार सहज मिळत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रतीक्षा
काही कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी अजूनही जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काही कंपन्यांच्या कार खरेदीसाठी प्रतीक्षा यादी कमी झाली आहे.
१५८ व्यावसायिक गाड्यांची विक्री
यंदा दसरा आणि दिवाळीत घरगुती चारचाकी वाहनांसोबत व्यावसायिक गाड्यांच्या विक्रीची आरटीओमध्ये मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे. जवळपास १५८ व्यावसायिक गाड्यांची विक्री झाल्याची नोंद आहे.
नवीन १०० रिक्षा रस्त्यावर
या महिन्यात पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, एलपीजी आणि सीएनजीवर धावणाऱ्या १०० पेक्षा जास्त रिक्षांची विक्री झाली आहे. सर्वाधिक विक्री इलेक्ट्रिक रिक्षांची झाल्याची माहिती आहे.
दसरा आणि दिवाळी एकाच महिन्यात आली. ऑक्टोबर महिन्यात १० हजारांपेक्षा जास्त दुचाकी आणि २५९० पेक्षा जास्त चारचाकींची विक्री झाल्याची माहिती आहे. यामध्ये १० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा आहे. यंदा विक्रेत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता.
डॉ. पी.के. जैन, दुचाकी व चारचाकी विक्रेते.