नागपुरात पोलिसाच्या पंटरला मारणारा बुकी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:42 PM2019-03-16T22:42:33+5:302019-03-16T22:47:10+5:30
पोलिसाच्या पंटरला बेदम मारहाण करून त्याच्याजवळची रक्कम तसेच सोनसाखळी हिसकावून नेणारा कुख्यात बुकी तसेच ड्रग्ज विक्रेता मधू सुरेंद्रकुमार सिंघल ऊर्फ अग्रवाल (वय ४२, रा. गोमती हॉटेलमागे पारडी) याच्या अखेर नंदनवन पोलिसांनी मुसक्या बांधल्या. या प्रकरणाची माहिती देतानाच गुन्ह्यातील अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसाच्या पंटरला बेदम मारहाण करून त्याच्याजवळची रक्कम तसेच सोनसाखळी हिसकावून नेणारा कुख्यात बुकी तसेच ड्रग्ज विक्रेता मधू सुरेंद्रकुमार सिंघल ऊर्फ अग्रवाल (वय ४२, रा. गोमती हॉटेलमागे पारडी) याच्या अखेर नंदनवन पोलिसांनी मुसक्या बांधल्या. या प्रकरणाची माहिती देतानाच गुन्ह्यातील अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आशिष सुरेशराव गायकी (वय ३१, रा. अयोध्यानगर, हुडकेश्वर) हा पोलिसांचा पंटर (खबऱ्या) आहे. सोमवारी ११ मार्चला तो सकाळी ११ च्या सुमारास कोहिनूर लॉन, वाठोडाजवळ असलेल्या आरोपी मधू अग्रवालच्या कार्यालयात गेला. मधू क्रिकेट बुकी असून गेल्या काही दिवसांपासून तो एमडी (ड्रग) पावडरचाही धंदा करतो. गायकीने त्याला १०० ग्राम एमडी पावडर मागितले. दोन लाख रुपयात सौदा पक्का करून गायकी मधूकडे गेला. मात्र, त्याने मधूला केवळ १ लाख ६० हजार रुपये दिले. ४० हजार रुपये देण्यासाठी नंगा पुतळा चौकात नेले. तेथे बराच वेळ थांबल्यामुळे मधूला संशय आला. त्याने गायकीला आपल्या कारमध्ये बसवून परत वाठोड्यात नेले. तेथे त्याने आधीच आपले मित्र बोलवून ठेवले होते. कार्यालयात पोहचल्यानंतर ‘तू आम्हाला पोलिसांकडून पकडून देणार होता’ असे म्हणत आरोपी मधू आणि त्याच्या साथीदारांनी गायकीला लाकडी दांडूने बेदम मारहाण केली. एकाने त्याच्या पायावर चाकू मारला तर मधूने पिस्तुलाच्या मुठीने गायकीच्या डोक्यावर फटका मारला.
जुना हिशेब काढला
गायकी आणि मधू अग्रवाल हे दोघेही आधी सोबत काम करायचे. ते दोघे क्रिकेट सट्टा आणि अमली पदार्थाचा धंदाही करायचे. गंगाजमुनातील एका मैत्रिणीमुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर बरेच दिवसांनी मधूकडे गायकी एमडीची खेप घ्यायला आला. मात्र, तो पोलिसांचा खबऱ्या असून, आपल्याला रंगेहात पकडून देण्यासाठी त्याला अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी पाठविल्याचे ध्यानात आल्याने, आरोपी मधू आणि त्याचे साथीदार कमालीचे संतापले.
त्यांनी गायकीजवळची १ लाख ६० हजारांची रक्कम, सोन्याची साखळी, मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला परत जुन्या हिशेबातील साडेतीन लाख रुपये मागितले. जीव धोक्यात असल्याचे पाहून गायकीने राहुल नामक मित्राला (पोलीस कर्मचारी) फोन केला. त्याने सांकेतिक भाषेत राहुलला सर्व सांगितले. त्यामुळे राहुल मोठ्या संख्येत मित्र (पोलीस) घेऊन मधूने बोलविलेल्या अयोध्यानगरातील ग्राऊंडजवळ बोलविले. त्याची कुणकुण लागताच मधू आणि त्याचे साथीदार गायकीला आपल्या कारमधून उतरवून पळून गेले. पोलिसाच्या पंटरला बुकीने मारल्याचे वृत्त लोकमतने ठळकपणे प्रकाशित केल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. त्यामुळे तहसील, नंदनवनसह गुन्हे शाखेचे पोलीसही मधू अग्रवाल आणि साथीदारांचा शोध घेऊ लागले. सावनेर बसस्थानकाजवळच्या सुमित लॉजमध्ये आरोपी मधू दडून बसल्याची खात्री पटल्याने परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रोशन, सहायक आयुक्त घार्गे, नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद भोळे, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, एएसआय रमेश चिखले, हवालदार सचिन एम्प्रेडवार, नायक ओंकार बाराभाई, राजेश शिरभाते, दिलीप अवगान, भीमराव ठोंबरे, रोशन निंबर्ते, अभय मारोडे त्याचप्रमाणे सायबर सेलचे दीपक तऱ्हेकर आणि मिथून नाईक यांनी शनिवारी सकाळी मधू अग्रवालला सावनेरात जाऊन जेरबंद केले. त्याच्याकडून तीन मोबाईल, स्वीफ्ट कार जप्त करण्यात आली असून, त्याच्या साथीदारांनाही आम्ही लगेच अटक करू, असे उपायुक्त रोशन यांनी पत्रकारांना सांगितले.
त्या पोलिसांचे काय?
मधूला एमडी पावडर तस्करीत अटक करण्यासाठी गुन्हे शाखेच्या एनडीपीएसच्या दोनपैकी एका शाखेच्या पोलिसांनी गायकीच्या माध्यमातून सापळा लावला होता. मात्र, पोलिसांच्याच दुसºया शाखेतील एकाने मधूला ही माहिती दिल्याने तो अलर्ट झाला. त्यामुळे ती डील फसली अन् गायकीलाही बेदम मार खावा लागला. दोन आठवड्यांपूर्वी मोहित नामक तस्कराला पाचपावली पोलिसांनी रंगेहात पकडले. यावेळी गुन्हे शाखेतील एनडीपीएसचा एका कर्मचाऱ्याने सापळा लावणाऱ्या पोलिसाला मोहितला पकडल्याबद्दल दमदाटी केली होती. ही केवळ दोन उदहारणे आहेत. गुन्हे शाखेतील अनेक कर्मचारी, अधिकारी अमली पदार्थ विक्रेत्यांच्या थेट संपर्कात असून, ते उघड झाल्यामुळे चार पीएसआयसह सहा जणांना निलंबितही करण्यात आले आहे. तरीसुद्धा अनेक पोलीस कर्मचारी बेधडकपणे अंमली पदार्थांच्या तस्करांना प्रोटेक्शन देऊन लाखोंचा प्रोटेक्शन मनी उकळत आहेत. या पोलिसांवर काय कारवाई करणार, असे प्रश्न आज पत्रकारांनी पोलीस उपायुक्त रोशन यांना विचारले असता त्यांनी त्याची स्वतंत्र चौकशी केली जाईल, असे सांगितले.