बुकी बाजारात पडत आहे नोटांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 08:10 AM2021-10-08T08:10:00+5:302021-10-08T08:10:02+5:30
Nagpur News दलालांच्या माध्यमातून काही भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरून उपराजधानीतील बुकींनी पुन्हा बुकी बाजार गरम केला आहे. ते कोट्यवधींची खयवाडी करून नागपूर तसेच नागपूर ग्रामीणमध्ये रात्रंदिवस पैशांचा पाऊस पाडत आहेत.
नरेश डोंगरे ।
नागपूर : दलालांच्या माध्यमातून काही भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरून उपराजधानीतील बुकींनी पुन्हा बुकी बाजार गरम केला आहे. ते कोट्यवधींची खयवाडी करून नागपूर तसेच नागपूर ग्रामीणमध्ये रात्रंदिवस पैशांचा पाऊस पाडत आहेत.
मध्य भारतातील सर्वात मोठे सेंटर म्हणून नागपूरचा बुकी बाजार सर्वत्र कुपरिचित आहे. वेस्ट इंडिज आणि भारतादरम्यानचा सामना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने त्याचा साथीदार मुकेश कोचरच्या माध्यमातून ‘फिक्स’ केल्याचा खळबळजनक प्रकार सर्वश्रुत आहे. तेव्हा नागपुरात पोलीस उपायुक्त असलेले, सध्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीच मुकेश कोचर आणि मर्लोन सॅम्युअलची ‘फिक्सिंग’ उघड केली होती.
देश-विदेशातील क्रिकेट विश्वात त्यावेळी खळबळ उडाली होती. त्यानंतर येथील अग्रवाल-भाटिया जोडगोळीने अडीच हजार कोटींची मॅच फिक्स केल्याचा प्रकार दिल्ली पोलिसांनी उघड केला होता. यातून नागपूरच्या बुकींचे देशविदेशातील कनेक्शन आणि त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर होणारी शेकडो कोटींची खयवाडीसुद्धा उघड झाली होती. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वर्षभरापूर्वी कुख्यात फिक्सर अग्रवाल, त्यांच्या पैशाचा व्यवहार सांभाळणारे हवालावाले तसेच त्यांच्या दलालांना एकत्र करून त्यांची ‘झिरो माईल जवळ खास खातिरदारी’ केली होती. ती एवढी जबरदस्त होती की दहशतीत आलेले अनेक बुकी गोव्यात तर काही दुबईत पळून गेले होते. तेथूनच सहा-आठ महिने त्यांनी आपला धंदा केला.
दरम्यानच्या काळात बुकींची दलाली करणाऱ्यांनी काही भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरले. त्यांना कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिले. त्याबदल्यात कोट्यवधींचा व्यवहार करून त्यांनी बुकींना ‘स्पॉट’ नेमून दिले. त्यानुसार, शहरातील सर्वात मोठा बुकी अलेक्झांडर याने नागपूर ग्रामीणच्या सीमेतून आपला राज सुरू केला आहे. त्याच्यासोबत कालू, हरंचदानेचा लाल, पंकज कडी, बंटी ज्यूस, बॅटरी गुल, अतुल धरमपेठ यांच्यापैकी काहींनी नागपुरातून तर काहींनी नागपूर ग्रामीणमधून बिनबोभाट खयवाडी चालवली आहे. यातून ते रोज कोट्यवधींची उलाढाल करत आहेत.
मोठ्या बुकीवर कारवाई नाही
बुकी बाजार गरम झाल्याचे संबंधित वर्तुळातील अनेकांना माहीत आहे. मात्र, कोणत्याही मोठ्या बुकीवर कारवाई होत नाही. गेल्या चार महिन्यात एकाही मोठ्या बुकीला पोलिसांनी पकडले नाही. त्यामुळे पोलिसांचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
----