नवरात्रात दोन हजार कार आणि पाच हजार दुचाकींचे बुकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 10:59 AM2021-10-14T10:59:33+5:302021-10-14T11:18:01+5:30
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मे महिन्यापासूनच चारचाकी गाड्यांना मागणी वाढू लागली असून सणांच्या दिवसांत अचानक वाढ झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात २ हजार चारचाकी, तर ५ हजारांपेक्षा जास्त दुचाकी गाड्यांचे बुकिंग झाले आहे.
नागपूर : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत असूनही दुसरीकडे नागरिकांचा वाहनखरेदीचा ओघही वाढतच आहे. यावर्षी जिल्ह्यात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर २ हजार कार आणि ५ हजारांच्यावर बाईक्सचे बुकिंग झाले असल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलची शंभरी पार होऊनसुद्धा चारचाकी आलिशान गाड्यांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीने वाढली आहे. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दोन हजार चारचाकी, तर पाच हजारांपेक्षा जास्त दुचाकी गाड्यांचे बुकिंग झाले आहे. बुकिंग जास्त झाले तरीही चारचाकी गाड्यांमध्ये लागणाऱ्या सेमी-कंडक्टर चीपमुळे ग्राहकांना डिलिव्हरी देण्यास अडचण येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी दसऱ्याला विविध शोरूममधून एक हजारापेक्षा जास्त चारचाकी गाड्यांची विक्री झाली होती. यंदा हा आकडा दोन हजारांपेक्षा जास्त जाईल, असा विक्रेत्यांना विश्वास आहे. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मे महिन्यापासूनच चारचाकी गाड्यांना मागणी वाढू लागली. त्यातच सणांच्या दिवसांत अचानक वाढ झाली आहे. नागपुरात जवळपास १४ पेक्षा जास्त कंपन्यांचे विक्रेते आहेत. मारुती, ह्युंडई, टाटा, मर्सिडीज, महिन्द्र, निसान, फोक्सवॅगन, फोर्ड, एमजे, किया, टोयोटा, जीप, रेनॉल्ट, स्कोडा अशा नामवंत आलिशान गाड्यांचे शोरूम आहेत. या सर्व शोरूममध्ये लोकांनी आवडत्या गाडीचे बुकिंग केले आहे.
निर्मिती प्रकल्पात उत्पादन अर्ध्यावर
सेमी-कंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स चीपचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सर्व चारचाकी गाड्यांच्या निर्मिती प्रकल्पात गाड्यांचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. त्यामुळे आता बुकिंग केलेल्या गाड्या डिसेंबरपर्यंत ग्राहकांना मिळतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. लोक थांबण्यास तयार आहेत. सध्या कंपन्यांकडून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. मलेशिया, तैवान, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि चीन येथून सेमी-कंडक्टर चीपचा पुरवठा कमी असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.
कोरोनानंतर गाड्यांच्या विक्रीत वाढ
कोरोनामुळे गाड्यांची विक्री वाढेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांना नव्हती; पण अचानक मागणी वाढल्याने विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पण गाड्या वेळेत देण्यात विक्रेत्यांना अडचण येत आहेत. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक गाड्यांचेही बुकिंग वाढले आहे. सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स चीपमुळे गाड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
ग्राहकांची सर्वच गाड्यांना पसंती...
बाजारात चार लाखांपासून ७० ते ८० लाखांपर्यंत गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असले तरीही ग्राहकांची सर्वाधिक पसंती याच गाड्यांना आहे. कोरोनानंतर लोकल प्रवास करण्यासाठी प्रत्येक घरात छोटी चारचाकी कार असावी, याकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. चारचाकीसोबतच मालवाहतूक गाड्या, दुचाकी गाड्यांची मागणी वाढली आहे.
दुचाकी गाड्या उपलब्ध
पुढे महाविद्यालय सुरू होणार असल्याने अनेक पालक बाईक आणि स्कूटरेट खरेदीसाठी पुढे येत आहेत. सर्वच विक्रेत्यांकडे दुचाकी उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा जास्त दुचाकीचे बुकिंग झाले आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून लोक गाड्या घरी नेत आहेत. अनेकजण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुचाकी घरी नेण्याच्या तयारीत आहेत.
ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह
कोरोनानंतर दुचाकी व चारचाकी गाड्यांची विक्री वाढली, ही बाब खरी आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चारचाकीची डिलिव्हरी देण्यास अडचण येत आहे; पण दुचाकी सहज उपलब्ध आहे. अनेक शोरूममध्ये दुचाकीवर सवलत देण्यात येत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.