विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पुस्तके परत करावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:12+5:302021-07-03T04:06:12+5:30
नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु ...
नागपूर : शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडे असलेली मागील वर्षीची शिल्लक पुस्तके शाळेत जमा करण्यात आली होती. परंतु आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नयेत, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे कालपर्यंत विद्यार्थ्यांकडून शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार असून, शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शिक्षण विभागात सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे.
मागील संपूर्ण सत्रभर शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील चांगल्या स्थितीतील पाठ्यपुस्तके परत घेऊन परत आलेली पाठ्यपुस्तके वजा करून नवीन शैक्षणिक सत्राकरिता पाठ्यपुस्तकांची मागणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेण्यात आली. जवळपास चाळीस ते पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली. तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली; आणि आता सेतू वर्गाचे कारण देत पुस्तके परत न घेण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली.
त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. शिवाय नवीन मागणी कमी करण्यात आल्याने नवीन पाठ्यपुस्तके किती प्रमाणात मिळणार, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात पालक व विद्यार्थ्यांना एकाच कामासाठी वारंवार शाळेत बोलावणे ही बाब अत्यंत चुकीची व अप्रासंगिक आहे. पालकांचीसुद्धा नाराजी आहे.
- सेतू वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके साहाय्यभूत ठरणार आहेत ही बाब खरी आहे. परंतु शासनाच्या धरसोड निर्णयामुळे आधी जमा केलेली पाठ्यपुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. हा निर्णय स्थानिक यंत्रणा व शिक्षकांवर ताण वाढवणारा व गोंधळात टाकणारा आहे.
लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर