यंदा पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:05 PM2019-06-21T23:05:37+5:302019-06-21T23:08:31+5:30
समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तकांचे वाटप करण्यात येते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय व नागपूर महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयाने २०१९-२० या वर्षासाठी ५३,३६,०७३ पुस्तकाची मागणी केली होती. या मागणीनुसार बालभारतीच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातर्फे ७ जून रोजी १०० टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तकांचे वाटप करण्यात येते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय व नागपूर महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयाने २०१९-२० या वर्षासाठी ५३,३६,०७३ पुस्तकाची मागणी केली होती. या मागणीनुसार बालभारतीच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातर्फे ७ जून रोजी १०० टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.
नागपूर विभागातील शाळा २६ जूनपासून सुरू होणार आहे. हा पुस्तकांचा पुरवठा जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित व महापालिकेच्या शाळांना होणार आहे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातर्फे तालुकानिहाय पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. ५३ लाख ३६ हजार ७३ पुस्तकांच्या प्रतीची किंमत २२ कोटी ९१ लाख ५२ ह जार ४८६ रुपये आहे. पुस्तक पुरवठा झाल्यासंदर्भातील माहिती वितरण केंद्रातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालय व प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होऊ नये म्हणून प्रत्येक पुस्तकावर बारकोड लावण्यात आले आहे. तसेच या पुस्तकांवर छापील किंमत देण्यात आलेली नाही. शाळा सुरू होण्याच्या २० दिवसांपूर्वी पुस्तके तालुक्यावर पोहचल्याने यंदा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील, अशी अपेक्षा आहे.
जिल्हानिहाय पुरवठा
नागपूर ९,५८,४६९
भंडारा ६,१७,५७१
वर्धा ५,३२,९८८
चंद्रपूर १०,०७,७४५
गडचिरोली ६,३४,४८६
गोंदिया ६,९१,२६४
नागपूर (मनपा) ८,९३,५५०
राज्य शिक्षण मंडळाच्या ९ ते १२ वर्गाची पुस्तके बाजारात
राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या ९ ते १२ वर्गाच्या पुस्तकांचे वितरण बालभारती करते. ही पुस्तके बाजारपेठेतून विद्यार्थ्यांना घ्यावी लागतात. ही पुस्तकेही बाजारपेठेत पोहचली आहे. तसेच १ ते ८ वर्गाच्या विनाअनुदानित शाळेत मोफत पुस्तके पुरवण्यात येत नाही. अशा विनाअनुदानित शाळेत शिकणाऱ्या १ ते ८ च्या विद्यार्थ्यांचीही पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.