राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या विस्ताराला ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:25 AM2018-04-03T10:25:24+5:302018-04-03T10:25:38+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

'Boost' expansion of national highways in the state | राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या विस्ताराला ‘बूस्ट’

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या विस्ताराला ‘बूस्ट’

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरात साडे २१ हजार कोटींहून अधिकच्या कामांचे वाटप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा धडाका

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून प्रत्यक्षात हजारो कोटींच्या कामांचे वाटप झाले असून बांधकामाला सुरुवातदेखील झाली आहे. वर्षभरात राज्यामध्ये साडे २१ हजार कोटींहून अधिक निधीच्या कामांचे वाटप झाले असून एकूण मार्गाची लांबी ही पाऊणेचार हजार किलोमीटरहून अधिक राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नितीन गडकरी यांनी देशातील सर्वात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रातच होत असल्याची माहिती लोकसभेत दिली होती. २०१७-१८ या कालावधीत मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीसाठी प्रत्यक्षात किती कामाचे वाटप करण्यात आले याची माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. मंत्रालयातर्फे एकूण ३ हजार ७६९ किलोमीटर लांबीच्या महामार्गांसाठी २१ हजार ९३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे. कामाचे वाटप हे सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) आणि ‘एनएचएआय’ (नॅशनल हायवे आॅथोरिटी आॅफ इंडिया) यांना करण्यात आले. ३ हजार २१ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ७ हजार ८४१ कोटींचे काम देण्यात आले आहे. ‘एनएचएआय’कडे ७४८ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली असून यासाठी १४ हजार ९० कोटी ४९ लाख रुपयांचा खर्च लागणार आहे.

१४ महामार्गांचे चौपदरीकरण
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे ‘एनएचएआय’ला देण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण व सहापदरी रुंदीकरण यांचा समावेश आहे. सोलापूर-बिजापूर (१०९.०८ किमी), औरंगाबाद-कोराडी (३०.२१५ किमी), कोराडी-तेलवाडी (५५.६१ किमी), औसा-चाकूर (५८.५१ किमी), चाकूर-लोहा (७४.३४५ किमी), लोहा-वारंगा (५६.५६९ किमी), सांगली-बोरगाव (४१.४४४ किमी), बोरगाव-वाटंबरे (५२ किमी), वाटंबरे-मंगलवेढा (५६.५० किमी), मेडशी-वाशीम (४४.५० किमी), वाशीम-पांगरे (४२.३ किमी), अक्कलकोटी-सोलापूर (३८.९५२ किमी) या मार्गांचे चौपदरीकरण होणार आहे. तर पिंपळगाव-नाशिक-गोंडे (३.८१ किमी उर्वरित काम), पिंपळगाव-नाशिक-गोंडे (७.५७ किमी अतिरिक्त काम) या मार्गाचे सहा पदरी रुंदीकरण करण्याची जबाबदारी ‘एनएचएआय’कडे आहे. तर ठाणे-वडापे (२३.४६५ किमी) या मार्गाचे सहा ते आठ पदरी रुंदीकरण होणार आहे.

६५ मार्गांचा समावेश
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआरडीसी’ला वाटप करण्यात आलेल्या कामांमध्ये राज्यातील ६५ मार्गांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४६, तर ‘एमएचएआय’कडे १९ मार्गांच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: 'Boost' expansion of national highways in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.