‘लांब रोट्या’ व्यवसायाला मिळावा बूस्ट : क्लस्टर स्थापन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:05 PM2019-03-08T23:05:32+5:302019-03-08T23:06:24+5:30
खाद्य संस्कृतीमध्ये ‘सावजी’ ही जशी नागपूरची ओळख ठरली आहे. तशीच एक ओळख म्हणजे ‘लांब रोट्या’ होय. केवळ नागपुरात तयार होत असलेल्या या लांब रोट्याचा व्यवसाय क्लस्टर पद्धतीने झाल्यास हा नागपूरचा ब्रांड ठरू शकतो. अलीकडे या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला शासन स्तरावर प्रोत्साहनाची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खाद्य संस्कृतीमध्ये ‘सावजी’ ही जशी नागपूरची ओळख ठरली आहे. तशीच एक ओळख म्हणजे ‘लांब रोट्या’ होय. केवळ नागपुरात तयार होत असलेल्या या लांब रोट्याचा व्यवसाय क्लस्टर पद्धतीने झाल्यास हा नागपूरचा ब्रांड ठरू शकतो. अलीकडे या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला शासन स्तरावर प्रोत्साहनाची गरज आहे.
एखाद्याच्या घरी पाहुणे आले असतील आणि त्यांचा पाहुणचार करायचा असेल तर हमखासपणे लांब रोट्या बनवल्या जातात. एक प्रकारे लांब रोट्या या मान सन्मान वाढवणाऱ्या आहेत. त्याला नागपूरचे ‘राजभोज’ असे म्हटले तर ते खोटे ठरणार नाही. परंतु या लांब रोट्या बनवण्याची एक वेगळीच कला आहे. त्यामुळेच ती कुणालाही बनवता येत नाही. अतिशय मोजक्या महिलाच त्या बनवतात. नागपुरात जवळपास ५०० वर महिला या व्यवसायाशी जुळलेल्या आहे. दक्षिण नागपुरातील शताब्दी चौक परिसर आणि उत्तर नागपुरातील इंदोरा परिसरात लांब रोट्या बनवणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. शहरातील इतरही भागात महिला लांब रोट्या बनवतात परंतु त्याचे प्रमाण कमी आहे.
रस्त्यावर कुठेही चूल मांडून महिला लांब रोट्या बनवतात. कुणी आपल्या घरीच बनवतात. हा व्यवसाय असला तरी तो विखुरला असल्याने त्या महिलांनाही फारसा लाभ होताना दिसत नाही. तेव्हा या महिलांना एकत्र आणून या व्यवसायाचे क्लस्टर तयार झाल्यास याला एका चांगल्या व्यवसायाचे स्वरूप येऊ शकते, या उद्देशाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे आणि त्यांच्या पत्नी सुजाता भोंंगाडे यांनी प्रयत्न सुरू केले. नवनिर्माण महिला संघर्ष समिती निर्माण केली. त्या अंतर्गत लांब रोट्या बनवणाºया महिलांशी संपर्क साधला. त्यांना याबाबत समजावून सांगितले. त्यांनाही कल्पना आवडली. यानंतर सर्व महिलांची एक बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र उद्योजिका विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी एच.आर. वाघमारे यांना बोलावून त्यांच्यासमोर लांब रोट्या बनवणाºया महिलांनी त्या कशा रस्त्यावर, चौकात बसून रोट्या बनवितात. उन्हात, हिवाळ्यात, पावसाळ्यात काम करावे लागते. आदी अनेक समस्या त्यांनी सांगितल्या. यावर वाघमारे यांनी क्लस्टरबाबत मार्गदर्शन करीत सकारात्मक मदत करण्याचे आश्वासनही दिले.
या बैठकीत समितीच्या संयोजक सुजाता भोंगाडे, वनिता ठाकरे, सिंधू भगत, कांचन काळे, सुनंदा गायकवाड, माधुरी मानकर, माधुरी शेवाळे, दमयंती दुबे, सरिता जुनघरे, अश्विनी भारद्वाज, दुर्गा मुंजेवार, उमा रंगारी व विलास भोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सरकारने मदत केल्यास नागपूरलाही ओळख मिळेल
लांब रोट्या व्यवसाय हा नागपुरातच होतो. आम्ही ५० महिलांना एकत्र करून छोटेखानी क्लस्टर तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु सरकार विविध उद्योगांचे क्लस्टर तयार करीत असते. लांब रोट्याच्या व्यवसायाला सरकारने मदत केली तर हा छोटेखानी उद्योग मजबुतीने उभा राहील आणि नागपूरलाही एक ओळख मिळेल.
विलास भोंगाडे, कामगार नेते