ग्रामपंचायत निकालामुळे भाजपला बूस्टर डोस; आता शत - प्रतिशतचा नारा
By योगेश पांडे | Published: November 6, 2023 10:29 PM2023-11-06T22:29:19+5:302023-11-06T22:29:39+5:30
अनेक गावांमध्ये बूथप्रमुख, पेजप्रमुख लावले कामाला : मोठ्या निवडणुकांसाठी संघटनेच्या तयारीची केली चाचणी
नागपूर : २०१९ नंतर सातत्याने विविध निवडणुकांमध्ये अपेक्षेनुरुप निकाल पदरी न पडल्याने नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काहीसा चिंतेचा सूर होता. मात्र, सोमवारी घोषित झालेल्या ग्रामपंचायत निकालांत भाजप समर्थित पॅनल्सचा विजय झाल्याने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. एका दृष्टीने लोकसभा - विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने संघटन कौशल्य तपासण्याची ही ‘लिटमस टेस्ट’ होती व त्यात पक्षाला यश मिळाले. हा ग्रामीण भागासाठी ‘बूस्टर डोस’ मानण्यात येत असून, पक्षाच्या नेत्यांकडून आता जिल्ह्यासाठी ‘शत - प्रतिशत’ विजयाचा नारा देण्यात येत आहे.
सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सहापैकी दोनच जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर विधानपरिषदेचा पदवीधर मतदारसंघ तसेच शिक्षक मतदारसंघातदेखील भाजपच्या पदरी अपयश आले होते. नागपूर जिल्हा संघटनेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत होते. भाजपच्या नेत्यांना नागपूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अशा निकालांची अपेक्षा नव्हतीच. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील हे बोलून दाखविले. जिल्ह्यात एकूण जागांपैकी ७० टक्क्यांहून अधिक ठिकाणी पक्षाचे समर्थित पॅनल्स जिंकून आल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात आला आहे. काही महिन्यांअगोदरच जिल्ह्यात पक्ष नेतृत्त्वात बदल करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्त्वात भाजप समर्थित पॅनल्सने ज्या पद्धतीने नियोजन केले, त्याचा फायदा झाल्याचे पदाधिकारी सांगत आहेत.
लोकसभा निवडणुकीची ‘टेस्ट’च
ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्या तरी भाजपने मात्र या निवडणुकांना लोकसभा - विधानसभेची ‘लिटमस टेस्ट’च मानले होते. त्यादृष्टिनेच नियोजन करण्यात आले होते. भाजपने त्यांच्या संघटनेतील बुथप्रमुख, पेजप्रमुखांनादेखील कामाला लावले. तसेच घर चलो मोहीम, संवाद मोहीमदेखील राबविली. विशेषत: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला काटोल, सुनील केदारांचे वर्चस्व असलेले सावनेर येथे पक्ष संघटना कामाला लावली होती. ग्रामपंचायत निवडणूक लोकसभा निवडणुकीची चाचपणी करणारी ठरली आहे. रामटेकमधून महायुतीचा जो उमेदवार असेल तो १०० टक्के निवडून येईल. विधानसभा मतदारसंघातही विजय मिळेल, असा दावा कोहळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
शत - प्रतिशतचे दावे, मात्र आव्हाने कायम
भाजपच्या नेत्यांकडून रामटेक लोकसभा मतदारसंघात तसेच जिल्ह्यातील सर्व सहाही जागांवर विजय मिळविण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हा विश्वास प्रत्यक्षात उतरणे दिसते तितके सोपे नाही, याची जाण नेत्यांनादेखील आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका व लोकसभा - विधानसभा निवडणुकांतील समीकरणे पूर्णत: वेगळी असतात. शिवाय प्रचाराचे मुद्दे, मतदारांचा दृष्टिकोन या निवडणुकांसाठी व्यापक होतो. रामटेकमध्ये महायुतीमधीलच ‘पार्टनर’ असलेले आशिष जयस्वाल यांच्याविरोधात माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली होती, त्यातूनच ‘ऑल इज वेल’ नसल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर पायाला भिंगरी लावल्यागत महाराष्ट्र पिंजून काढणारे प्रदेशाध्यक्ष व गणिताचे गुरुजी राहिलेले जिल्हाध्यक्ष कोहळे यांच्या नियोजनाचे कौशल्य पणाला लागणार आहे.