सीमातार्इंचा सामाजिक वारसा हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:57 AM2017-09-15T00:57:42+5:302017-09-15T00:58:04+5:30
स्वभावाने अत्यंत मायाळु, गरिबांविषयी कणव, प्रचंड हुशार, वक्तृत्वातही सुंदर, असे एक ना अनेक स्वभावगुण अॅड. सुहासिनी साखरे यांच्यात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वभावाने अत्यंत मायाळु, गरिबांविषयी कणव, प्रचंड हुशार, वक्तृत्वातही सुंदर, असे एक ना अनेक स्वभावगुण अॅड. सुहासिनी साखरे यांच्यात होते. त्यांच्या निधनाने आईची काळजी घेणारी एक आदर्श मुलगी अन् सीमाताई साखरेंचा सामाजिक वारसा समर्थपणे पुढे नेणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
सुहासिनी साखरे यांनी लॉ कॉलेजमधून सुवर्णपदक घेऊन एलएलबीची पदवी पूर्ण केली. त्यानंतर लंडनच्या केंब्रिज विद्यापीठातूनही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून एलएलएमच्या पदवीत सुवर्णपदक मिळविले. सात वर्षांपूर्वी त्या नागपुरात परतल्या. नागपुरात त्यात इंटरनॅशनल लॉयर्स असोसिएशनमध्ये काम करीत होत्या. १६ आॅक्टोबरला याच असोसिएशनतर्फे जॉब करण्यासाठी त्या सॅनफ्रान्सिस्कोला जाणार होत्या. अॅड. सुहासिनी या स्वभावाने अतिशय प्रेमळ होत्या. समाजातील गोरगरिबांविषयी त्यांना विशेष आस्था होती. कुशाग्र बुद्धीसोबतच त्या वकृत्व कलेतही पारंगत होत्या. केवळ वकिली व्यवसायातच नव्हे तर साहित्य क्षेत्राचीही त्यांना आवड होती. त्यांचे इंग्रजी कवितांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. आपली आई सीमाताई साखरे यांची त्या अतिशय काळजी घेत होत्या. सीमाताईंना औषध देण्यापासून त्यांनी जेवण केले की नाही, यावर नेहमीच त्या लक्ष ठेवून असत. त्यांच्या निधनामुळे सीमाताईंची काळजी घेणारी एक आदर्श मुलगी हरविली आहे. सीमाताईंच्या स्त्री अत्याचार विरोधी परिषदेतही त्या सक्रिय होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांचा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला भाऊ समीर तातडीने नागपूरला निघाला आहे. अॅड. सुहासिनीच्या अकाली जाण्यामुळे सीमाताई साखरेंचा सामाजिक वारसा काळाच्या पडद्याआड हरविला आहे.