दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Published: October 29, 2015 03:27 AM2015-10-29T03:27:40+5:302015-10-29T03:27:40+5:30

स्टिंग आॅपरेशन करून ब्लॅकमेल करीत एका होमिओपॅथी डॉक्टरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज ...

Both the anticipatory bail applications were rejected | दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Next

स्टिंग आॅपरेशन करून डॉक्टरला खंडणी मागण्याचे प्रकरण
नागपूर : स्टिंग आॅपरेशन करून ब्लॅकमेल करीत एका होमिओपॅथी डॉक्टरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
अजय बद्रीनारायण सोनी आणि विवेक वसंता तातेकर (४४) रा. रेशीमबाग, अशी आरोपींची नावे आहेत. हा गुन्हा उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. उमरेडच्या जोगीठाणा पेठ येथील रहिवासी डॉ. अरविंद राधेश्याम पंडित (५१) यांचे इतवारी पेठ येथे ‘राधे हॉस्पिटल’ आहे. पंडित हे होमिओपॅथी डॉक्टर आणि जनरल फिजिशियन आहेत. आरोपींपैकी अजय सोनी हा ‘फार्मशी टाइम्स’ नावाच्या साप्ताहिकाचा संपादक आहे. विवेक तातेकर हा गांधीबाग येथे होलसेल औषध विक्रीचे दुकान चालवितो.
डॉ. अरविंद पंडित यांच्या तक्रारीवरून या दोन्ही आरोपींविरुद्ध २५ जुलै २०१५ रोजी उमरेड पोलीस ठाण्यात भादंविच्या ३८४, ५०१, ५०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल होण्याच्या दीड महिन्यापूर्वी अजय सोनी याने ‘डमी पेशंट’ कल्याणी वाघ नावाच्या तरुणीला डॉ. पंडित यांच्या इस्पितळात दाखल करून स्टिंग आॅपरेशन केले होते. त्याने छायाचित्रे घेतली होती. पंडित हे बोगस डॉक्टर आहेत, हे दाखवण्यासाठी त्याने आपल्या साप्ताहिकात वृत्त प्रकाशित केले होते. नंतर पुन्हा हे वृत्त प्रकाशित न करण्यासाठी त्याने पंडित यांना ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती.
अजय सोनी याने ९ जुलै २०१५ रोजी प्रसिद्ध होणारी बातमी अरविंद पंडित यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी ५ जुलै रोजीच अरविंद पंडित यांचे बंधू संजीव पंडित यांच्या वॉटस्अपवर आपल्या अन्य साथीदारांमार्फत पोस्ट केली होती.
संजीव पंडित यांचेही उमरेड येथे पूजा मेडिकल स्टोअर्स या नावाने औषधांचे दुकान आहे. या शिवाय अरविंद पंडित यांची बदनामी करणारी छायाचित्रे आणि वृत्ताची कात्रणे अजय सोनी याने त्यांचे नजीकचे सहकारी डॉ. आकाश बल्की यांच्या वॉटस्अपवर पोस्ट केले होते.
आरोपी अजय सोनी आणि विवेक तातेकर हे एकमेकांना चांगले ओळखतात. तातेकरच्या मोबाईलवर आरोपी अजय, तातेकर आणि डॉ. अरविंद पंडित यांचे बंधू विजय यांच्यात पैशाच्या मागणीसाठी झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आणि कॉल रेकॉर्ड पोलिसांनी प्राप्त केले आहेत. (प्रतिनिधी)

डॉक्टरला ब्लॅकमेल करणारा सराईत गुन्हेगार
उमरेड येथील होमिओपॅथी डॉक्टर अरविंद पंडित यांना पाच लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणारा अजय सोनी हा सराईत गुन्हेगार असल्याचा अभिलेख उमरेड पोलिसांनी न्यायालयात दाखल केला. अजय सोनी याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. भिसी पोलीस ठाण्यात भादंविच्या ३८४, ३४ कलमान्वये, कोतवाली पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये दोन गुन्हे दाखल आहेत. राजापेठ पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२० कलमान्वये, अजनी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये, तहसील पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये तसेच चेक बाऊंसची २२ प्रकरणे दाखल आहेत. सोनीने २०१० मध्ये डॉ. राजेंद्र जावरकर यांना ब्लॅकमेल करून ५० हजाराच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण आहे, खंडणी वसूल करून पैशाचे वाटप कसकसे होत होते, डमी पेशंट कल्याणी वाघ हिचाही या आरोपींच्या मदतीने शोध घेणे असल्याने आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावे, अशी विनंती तपास अधिकारी उपनिरीक्षक विलासकुमार सानप यांनी न्यायालयाला केली असता, प्रकरण गंभीर असल्याने या दोघांचेही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले.

Web Title: Both the anticipatory bail applications were rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.