वेगवेगळ्या अपघातात विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:32 PM2018-03-03T23:32:36+5:302018-03-03T23:33:08+5:30
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा करुण अंत झाला तर एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. अवघ्या पाच तासाच्या अंतराने हे दोन जीवघेणे अपघात घडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा करुण अंत झाला तर एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. अवघ्या पाच तासाच्या अंतराने हे दोन जीवघेणे अपघात घडले.
बारावीचा विद्यार्थी असलेला पारितोष प्रदीप कोरे (वय १८, रा. प्रकाशनगर, गोधनी) हा त्याच्या एका मित्रासोबत शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास शिकवणी वर्गाला जात होता. मानकापूरच्या शफीनगर पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रक (जीजे १८/ एव्ही ९८१६) च्या चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पारितोष जागीच गतप्राण झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने धाव घेतल्याचे पाहून आरोपी ट्रकचालकाने खाली उडी मारून पळ काढला. जमावाने दगडफेक करून ट्रकला आगही लावण्याचा प्रयत्न केला. तर जमावातील काही जणांनी जखमी पारितोषच्या मित्राला खासगी इस्पितळात दाखल केले. विशेष म्हणजे, दुपारी झालेल्या या अपघातातील जखमी विद्यार्थ्याचे नाव रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. मानकापूर पोलिसांनी ट्रक जप्त केला. वाहनचालक फरार आहे.
या अपघातापूर्वी मानकापूर ठाण्याच्या हद्दीत सकाळी ११.१५ च्या सुमारास असाच एक जीवघेणा अपघात झाला. मानकापूर ते जरीपटका पुलाच्या मार्गावर भरधाव वाहनाने (एमएच ३१/ एफए २१८१) च्या चालकाने जोरदार धडक मारल्याने प्रतीक्षा जुगेश खोब्रागडे (वय २२) या महिलेचा करुण अंत झाला. प्रतीक्षा आणि तिचा पती जुगेश विजय खोब्रागडे (वय २८) हे दाम्पत्य मूळचे मुंडीपार सडक, ता. साकोली (जि. भंडारा) येथील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने ते नागपुरात आले. ते इंदोरा परिसरात राहत होते. शनिवारी सकाळी ११.१५ वाजता प्रतीक्षा तिच्या सायकलने जात असताना आरोपी वाहनचालक प्रशांतकुमार विजयप्रसाद (रा. खारकपुरा परासिया, बलिया, उत्तर प्रदेश) याने निष्काळजीपणे वाहन चालवून प्रतीक्षाचा बळी घेतला. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मानकापूर पोलिसांनी आरोपी वाहनचालकाला ताब्यात घेतले.
जखमी वृद्धाचा मृत्यू
हिंगण्याच्या पेंढरी देवळी शिवारात २६ जानेवारीला दुपारी इंडिका कारचालकाने धडक दिल्यामुळे विजय शंकरराव धुमाळ (वय ६८, रा. एस.टी. कॉलनी, वडगाव रोड यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. त्यांचा २१ फेब्रुवारीला मृत्यू झाला. मंगला विजयराव धुमाळ (वय ६३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी कारचालकाचा शोध घेतला जात आहे.