दोघांना तात्पुरता अटकपूर्व जामीन
By admin | Published: October 30, 2015 02:59 AM2015-10-30T02:59:41+5:302015-10-30T02:59:41+5:30
उमरेड येथील होमिओपॅथी डॉक्टर अरविंद पंडित यांच्या राधे स्पेशालिटी क्लिनिकचे स्टिंग आॅपरेशन करून...
हायकोर्ट : उमरेड येथील ब्लॅकमेल प्रकरण
नागपूर : उमरेड येथील होमिओपॅथी डॉक्टर अरविंद पंडित यांच्या राधे स्पेशालिटी क्लिनिकचे स्टिंग आॅपरेशन करून पाच लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. व्ही.एम. देशपांडे यांच्या एकलपीठाने दोन आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
उच्च न्यायालयाने आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उमरेड पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला नोटीस जारी करून १८ नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे. त्याच दिवशी दोन्ही आरोपींचा तात्पुरता अटकपूर्व जामीन कायम होण्यावर सुनावणी होणार आहे. अजय बद्रीनारायण सोनी आणि विवेक वसंतराव तातेकर रा. रेशीमबाग, अशी आरोपींची नावे आहेत.
त्यापैकी सोनी फार्मसी टाइम्सचा संपादक तर तातेकर हा होलसेल औषध विक्रेता आहे. डॉ. अरविंद पंडित यांच्या तक्रारीवरून या दोन्ही आरोपींविरुद्ध २५ जुलै २०१५ रोजी उमरेड पोलीस ठाण्यात भादंविच्या ३८४, ५०१, ५०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन हा तात्पुरता अटकपूर्व जामीन प्राप्त केला. उच्च न्यायालयात आरोपींच्या वतीने अॅड. योगेश मंडपे तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पी. व्ही. भोयर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
पोलीस करीत आहेत दिशाभूल
उमरेड पोलीस हे आमच्या संदर्भात जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप अजय सोनी याने केला. डॉ. अरविंद पंडित हे होमिओपॅथी डॉक्टर असून स्वत:ला बालरोगतज्ज्ञ असल्याचे सांगतात. ते इतर तीन बड्या डॉक्टरांच्या नावांचा गैरफायदा घेत आहेत. जनतेची होत असलेली फसवणूक चव्हाट्यावर आणण्यासाठी आपण खुद्द कल्याणी वाघ यांच्यासोबत रुग्ण बनून ८ जून रोजी पंडित यांच्या इस्पितळात गेलो होतो. तेथील चित्र अत्यंत भयावह होते. दुसऱ्याच दिवशी आपण अन्न व औषध प्रशासनाकडे चित्रीकरणासह या क्लिनिकची तक्रार केली होती. प्रकरण दाबण्यासाठी खुद्द डॉ. पंडित यांनी विवेक तातेकर यांच्याशी संपर्क साधला होता. तातेकर यांनी कधीही पैशासाठी पंडित यांच्याशी संपर्क साधला नाही. पोलिसांनी आपल्याबाबत इंटरनेटवरून माहिती गोळा करून न्यायालयात दाखल केली. बऱ्याच गुन्ह्यांशी आपला संबंध नाही, असेही सोनी याने सांगितले.