चिमुकलीसह दोघींशी अश्लील चाळे
By admin | Published: March 28, 2016 03:07 AM2016-03-28T03:07:37+5:302016-03-28T03:07:37+5:30
दोन आरोपींनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पहिली
नागपूर : दोन आरोपींनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पहिली घटना कोराडी तर दुसरी प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीतील आहे.
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आरोपीने (वय १५) अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला घरात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. ही संतापजनक घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. वेदनांमुळे चिमुकली रडू लागली. तिचा आवाज ऐकून आईने धाव घेतल्यानंतर हा संतापजनक प्रकार पुढे आला. शेजाऱ्यांना त्याची माहिती कळताच परिसरात रोष निर्माण झाला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
विनयभंगाची दुसरी घटना प्रतापनगरात २२ मार्चच्या दुपारी २.३० वाजता घडली. आरोपी अविनाश संतोषराव धवस (वय ३५) याच्या घरी पीडित मुलगी (वय १५) फेविकॉल मागण्यासाठी गेली होती. त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे आरोपीने तिला सोडून दिले. मुलीने आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
समाजमन चिंतित
शहरात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे वृत्त लोकमतने रविवारच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू असताना पुन्हा या घटना उघडकीस आल्याने समाजमन चिंतित झाले आहे.