नागपुरात दोघींची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:36 AM2019-04-19T00:36:05+5:302019-04-19T00:42:20+5:30
बेलतरोडी आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसह दोघींनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी भरदुपारी या दोन्ही घटना घडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेलतरोडी आणि अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसह दोघींनी गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी भरदुपारी या दोन्ही घटना घडल्या.
मनीषनगरातील श्री शिव अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या रश्मी विजय दुरणे (वय ३९) यांनी बुधवारी सकाळी १०. ३० ते ५.४५ या वेळेत गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. राहुल विजय दुरणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
अशाच प्रकारे अजनीतील बॅनर्जी ले-आऊटमध्ये कपिलवास्तू सहनिवासात राहणारी निकिता संजय पाटील (वय २४) हिने बुधवारी दुपारी २. ३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. संकेत संजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. निकिताच्या मृत्यूच्या अनुषंगाने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
करंट लागल्याने तरुणाचा मृत्यू
स्लॅब टाकण्यासाठी लावलेल्या हॅलोजनला इकडेतिकडे फिरवीत असताना करंट लागल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला. आशिष सरमन सराटे (वय २१) असे मृताचे नाव आहे. तो मूळचा शिवनी नवलगाव (मध्य प्रदेश) येथील रहिवासी होय. गिट्टीखदानमधील स्वागतनगरात एका इमारतीवर स्लॅब टाकण्याच्या कामासाठी बुधवारी रात्री हॅलोजन लावण्यात आला होता. त्याचा प्रकाश इकडेतिकडे करण्यासाठी आशिषने बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास हॅलोजनला हात लावून तो इकडेतिकडे फिरविण्यासाठी प्रयत्न करताच त्याला जोरदार करंट लागला. तो खाली पडून गंभीर जखमी झाल्याने इतरांनी त्याला मेयोत नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.