दोघांना जन्मठेप
By Admin | Published: February 19, 2017 02:12 AM2017-02-19T02:12:48+5:302017-02-19T02:12:48+5:30
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट शितला माता मंदिर चौकातील बहुचर्चित नौशाद आलम खान खूनप्रकरणी
न्यायालय : शितलामाता मंदिर चौकातील थरार
नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट शितला माता मंदिर चौकातील बहुचर्चित नौशाद आलम खान खूनप्रकरणी शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अन्य चार आरोपींची सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली.
आरिफ बक्श मेहबूब बक्श (३५) रा. गंजीपेठ आणि जाकीर बक्श मेहबूब बक्श (४०) रा. महेंद्रनगर, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. निर्दोष सुटका झालेल्या आरोपींमध्ये पंकज ऊर्फ मोनू राजेंद्र मिश्रा, शेख इलियास शेख बहादर, शेख नजीर शेख बहादर आणि मोहम्मद इजाज शेख इलियास यांचा समावेश आहे. गंजीपेठ भागातील रहिवासी असलेल्या नौशाद खान (४२) याच्या खुनाची घटना ही ५ ते ६ जानेवारी २०१३ च्या रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास घडली होती.
या प्रकरणातील फिर्यादी शहागाजी ऊर्फ कैसर रा. हसनबाग हा आहे. शहागाजी आणि नौशाद हे महाराष्ट्र कर्नाटक ट्रान्सपोर्ट या नावाने कार्यालय थाटून भागीदारीत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचे. ईश्वरलाल शाहू हा त्यांच्या कार्यालयाचा मॅनेजर होता. ५ जानेवारी २०१३ रोजी शहागाजी आणि शाहू हे दोघे ट्रक लोड करण्यासाठी ताजबाग येथे गेले होते. त्यांच्या ट्रान्सपोर्टमार्फत ताजबागेतील प्रदर्शनातील साहित्य नांदेड येथे पोहोचवायचे होते. शहागाजी आणि शाहूच्या मागेच नौशादही ताजबाग येथे बिल्टी तयार करण्यासाठी गेला होता. रात्री १२ वाजताच्या सुमारास तिघेही घराकडे परतण्यास निघाले होते.
नौशादचा मित्र शितला माता मंदिर चौकात येणार असल्याने नौशाद आणि शहागाजी त्याची प्रतीक्षा करीत असताना त्याचवेळी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास एक टाटा इंडिगो कार त्यांच्याजवळ येऊन थांबली होती. कारमधील दोघांनी नौशादवर धारदार शस्त्राने वार करून आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केला होता. सक्करदरा पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना रंगेहात अटक केली होती. पोलिसांना तपास दरम्यान हा खून कट रचून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेपूर्वी ३१ डिसेंबर २०१२ रोजी गंजीपेठ येथे नौशाद खान याच्या गॅरेजमध्ये असलेल्या स्कोडा कारवर बांधकाम सुरू असलेल्या शेजारच्या शेख इलियास याच्या इमारतीवरून दगड पडून कारची काच फुटली होती. त्यामुळे नौशाद, त्याचा भाऊ यांचे शेख इलियास, त्याचा मुलगा एजाज आणि भाऊ शेख नजीर यांच्यासोबत भांडण झाले होते. मोहल्ल्यातील लोकांच्या मदतीने त्यांच्यात समझोता झाला होता. काही दिवसाने पुन्हा वाद निर्माण होऊन तो शिगेला पोहोचला होता. कारण शेख इलियास, त्याचा भाऊ आणि मुलाला मोहल्ल्यातील लोकांनी मारहाण केली होती. त्यामुळे त्यांना अपमानास्पद वाटत होते. या अपमानाचा सूड म्हणून त्यांनी नौशाद याच्या खुनाचा कट रचून आरिफ बक्श आणि जाकीर बक्श यांना त्याच्या खुनाची सुपारी दिली होती. सक्करदरा पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी तपास करून न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. दोन जणांविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने त्यांना भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेव्यतिरिक्त न्यायालयाने आरिफ बक्श याला भादंविच्या २९४ कलमांतर्गत ३ महिन्याचा कारावास आणि १ हजार रुपये दंड, ५०६ कलमांतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. इतर चार आरोपींची निर्दोष सुटका केली.
न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील प्रशांत भांडेकर, सरकारला सहायक म्हणून नावेद रिझवी, रुपेश पाटील, रितेश काटेकर यांनी तर आरोपींच्यावतीने अॅड. एस. शकील, अॅड. चंद्रशेखर जलतारे, अॅड. राम मासुरके, अॅड. आर. एम. पटवर्धन आणि अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. सहायक फौजदार रज्जक शेख, हेड कॉन्स्टेबल संतोष घोळवे, रविकिरण, अरुण भगत यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)