दोघांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा
By Admin | Published: July 8, 2016 02:57 AM2016-07-08T02:57:29+5:302016-07-08T02:57:29+5:30
प्रेमप्रकरणाची वाच्यता केल्याचा संशय घेऊन एका १७ वर्षीय तरुणीला ठार मारण्याच्या हेतूने मेहंदीबाग उड्डाण पुलावरून ...
उड्डाण पुलावरून तरुणीस फेकल्याचे प्रकरण : मेहंदीबागेतील घटना
नागपूर : प्रेमप्रकरणाची वाच्यता केल्याचा संशय घेऊन एका १७ वर्षीय तरुणीला ठार मारण्याच्या हेतूने मेहंदीबाग उड्डाण पुलावरून फेकणाऱ्या दोन जणांना गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपी रोशन ऊर्फ हरिहर तुकाराम कुहीकर (२३) रा. तांडापेठ चंद्रभागानगर आणि लखन केशव पौनीकर (२४) रा. खरबी रिंगरोड, वाठोडा ले-आऊट,अशी आरोपींची नावे आहेत. पिंकी सुंदर लिल्लारे,असे जखमी तरुणीचे नाव असून घटनेच्या वेळी ती कांजी हाऊस चौक येथील रहिवासी होती. या प्रकरणात आणखी एक विधिसंघर्षग्रस्त बालिका असून, तिच्यावर बालन्यायालयात खटला चालणार आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, हे दोन्ही आरोपी, पिंकी आणि १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालिका एकाच दुकानात नोकरी करीत होते. त्यापैकी आरोपी रोशनचे विधिसंघर्षग्रस्त बालिकेसोबत प्रेमसंबंध होते. पिंकीने या प्रेमप्रकरणाची दुकानातील लोकांकडे आणि आजूबाजूच्या लोकांजवळ वाच्यता केल्याचा आरोपींना संशय होता. काही दिवसानंतर खुद्द पिंकीनेच विधिसंघर्षग्रस्त बालिकेचा विवाह रोशनऐवजी लखन याच्यासोबत करून दिला होता. या प्रकाराने रोशन कुहीकर हा संतप्त झाला होता. पुढे या तिघांनीही पिंकीला कायमचे संपविण्याचे ठरवले होते.
घटनेच्या दिवशी २६ जुलै २०१३ रोजी पिंकी ही कामावरून घरी परतत असताना रोशन आणि विधिसंघर्षग्रस्त बालिकेने तिला रस्त्यात गाठले होते आणि एकांतात बोलायचे आहे, असे म्हटले होते. त्यामुळे पिंकी ही रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरून चकणा चौक येथे रोशनला भेटण्यासाठी आली होती.
रोशन आणि विधिसंघर्षग्रस्त बालिकेने पिंकीला मोटरसायकलवर बसवून ‘गुपचूप’ खाण्याच्या बहाण्याने प्रेमनगर पुलाकडून इतवारीकडे नेले होते. गुपचूप खाऊन झाल्यानंतर या दोघांनी तिला घरी पोहोचवून देतो, असे म्हटले होते. ते तिला दहीबाजारमार्गे मेहंदीबाग पुलाकडे घेऊन गेले होते. (प्रतिनिधी)