दोघांचे जामीन अर्ज फेटाळले
By admin | Published: February 24, 2017 03:04 AM2017-02-24T03:04:12+5:302017-02-24T03:04:12+5:30
नकली मालकीण दाखवून आणि बनावट दस्तावेज तयार करून हैदराबाद येथे वास्तव्यास असलेल्या एका वृद्धेची
नकली मालकीण दाखवून वृद्धेच्या जमिनीची विक्री
नागपूर : नकली मालकीण दाखवून आणि बनावट दस्तावेज तयार करून हैदराबाद येथे वास्तव्यास असलेल्या एका वृद्धेची पारशिवनी भागातील जमीन विकण्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींचे जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले.
सच्चिदानंद दूधनाथ तिवारी आणि चंद्रशेखर राजाराम भारद्वाज, अशी आरोपींची नावे आहे. त्यापैकी तिवारी हा या बनवाबनवीच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे.
प्रकरण असे की, शालिनी सुरेशसिंग तोमर यांची पारशिवनी भागात सर्वे क्रमांक ६३/२ मध्ये ४ हेक्टर जमीन आहे. तिवारी आणि साथीदारांनी या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून ते फिर्यादी महादेव कांबळे यांना दाखवले आणि ही जमीन विकण्याचा सौदा केला होता. कांबळे यानी तिवारीला ५१ हजार रुपये बयाना रक्कम म्हणून देण्याचे कबूल केले होते. या जमिनीची मालकीण पारशिवनी येथे आपल्या भावाकडे येणार असून तेथेच सौदाचिठ्ठी आणि करार करण्याचे ठरले होते.
१६ डिसेंबर २०१६ रोजी महादेव कांबळे हे ५१ हजार रुपये देण्यासाठी पारशिवनी येथे गेले होते. फिर्यादीचे साक्षीदार म्हणून तेथे त्यांचा मित्र कुलदीप सराटे हजर होता. पारशिवनी तहसील कार्यालयाच्या समोरील कँटिनमध्ये जमिनीचे मालक म्हणून तिवारी आणि अन्य तीन जण हजर होते. ३ लाख ५० हजारात ही जमीन विकण्याचे ठरले. ५१ हजार रुपये बयाना रक्कम म्हणून कांबळे यांनी तिवारी याला दिले होते. त्यांना मालकिणीचे निवडणूक ओळखपत्र दाखवून छायांकित प्रत देण्यात आली.
करारपत्रावर विक्रीदार म्हणून तिवारी आणि खरेदीदार म्हणून तिवारी यांनी स्वाक्षरी केली होती. काही दिवसानंतर कांबळे यांचा मित्र सराटे याने तिवारीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो भेटण्यास सतत टाळाटाळ करीत होता. संशय निर्माण झाल्याने कांबळे यांनी मूळ जमीन मालकिणीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता त्या मनसर येथील मूळ रहिवासी असल्याचे आणि सध्या त्या हैदराबाद येथे राहत असल्याचे त्यांना समजले होते.
निवडणूक ओळखपत्रही बनावट होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली होती. त्यांनी जामीन अर्ज दाखल केले असता न्यायालयाने ते फेटाळून लावले. (प्रतिनिधी)