ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोघांना अटक
By Admin | Published: October 31, 2015 03:19 AM2015-10-31T03:19:26+5:302015-10-31T03:19:26+5:30
स्वित्झर्लंड आणि जर्मनी येथील टुर्सच्या नावे बजाजनगर येथील विदर्भ कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स वेल्फेअर असोसिएशनची ..
विदेश सहलीच्या नावे २२.७० लाखांनी फसवले : ६ पर्यंत पीसीआर
नागपूर : स्वित्झर्लंड आणि जर्मनी येथील टुर्सच्या नावे बजाजनगर येथील विदर्भ कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स वेल्फेअर असोसिएशनची २२ लाख ७० हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी इंदूर येथील एनटीएच ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकिणीसह दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांनाही मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. ढुमणे यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला.
ट्रॅव्हल्स कंपनीची मालकीण निखिला गुप्ता आणि विवेक साहू, अशी आरोपींची नावे आहेत. या असोसिएशनचे माजी सचिव विनोद नरोत्तमसिंग वर्मा यांच्या तक्रारीवरून २७ आॅक्टोबर २०१५ रोजी अंबाझरी पोलिसांनी या दोघांविरुद्ध भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाची हकिकत अशी की, असोसिएशनचे विनोद वर्मा यांच्यासह २४ सदस्य स्वित्झर्लंड, जर्मनी आणि पॅरिस येथे स्वखर्चाने एकत्रित पैसे जमवून पर्यटनासाठी जाण्यास इच्छूक असल्याने इंदूरच्या या एनटीएच ट्रॅव्हल्स कंपनीकडून कोटेशन मागविण्यात आले होते. सदस्यांनी प्रती व्यक्ती ९४ हजार ५५० रुपये या खर्चाला मान्यता दिली होती. २२ ते २८ जुलै २०१५ पर्यंत या टुर्सचे आयोजन करण्यात आले होते. १२ जून ते २० जुलैपर्यंत या कंपनीच्या एचडीएफसी बँकेतील खात्यात २२ लाख ७० हजार रुपये आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे स्थानांतरित करण्यात आले होते. उर्वरित रक्कम टुर्स पूर्ण झाल्यावर दिली जाणार होती.
अन् टाळाटाळ सुरू केली
२२ जुलैच्या टुर्ससाठी सर्व सदस्य तयारीत गुंतले असतानाच अचानक ११ जुलै रोजी ट्रॅव्हल्स कंपनीचा विवेक साहू याने असोसिएशनला ई-मेल करून काही सदस्यांचे व्हिसा संदर्भातील कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कळवले होते. लागलीच या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. २० जुलै रोजी ट्रॅव्हल्सची मालकीण निखिला गुप्ता हिने विनोद वर्मा यांना फोन करून सांगितले की, नागपूरच्या धर्मादाय आयुक्तांनी सर्व सदस्यांचे व्हिसा रोखून धरले आहे. ते असोसिएशनच्या रजिस्ट्रेशनबाबत विचारणा करीत आहेत. ती माहितीही या ट्रॅव्हल्सकडे पाठविण्यात आली होती. पुन्हा निखिलाने फोन करून सांगितले की, दूतावासाने टुर्सबाबत शपथपत्रे मागितली आहेत. त्यामुळे ही टुर्स एक महिना पुढे ढकलण्यात आली होती. ट्रॅव्हल्सने पुन्हा अडचणी निर्माण करून २४ हजार रुपयांचा भरणा करण्यास लावले.
१९ आॅगस्ट २०१५ रोजी सदस्यांना व्हिसा मिळाला असता त्यांनी युरो करन्सी खरेदी करण्यासाठी विमानाच्या तिकिटांची मागणी केली होती. निखिलाने त्यांना एमिरेटस् फ्लाईटची तिकिटे पाठविली होती. मात्र या तिकिटांवर मंजुरीची तारीख आणि पीएनआर क्रमांक नव्हते. पुन्हा २१ आॅगस्ट रोजी निखिलाने असोसिएशनला सूचना दिली की, एमिरेटस एअरलाईनने आमच्या तिकीट बुकिंग रद्द केल्या आहेत. याबाबत असोसिएशनने चौकशी केली असता साहू आणि निखिलाने एमिरेटस दुबईला पैसेच दिले नव्हते. त्यामुळे बुकिंग रद्द करण्यात आले होते. असोसिएशनने जुलै २०१५ पर्यंत या ट्रॅव्हल्सला संपूर्ण पैसे दिले होते. असोसिएशनने आपले पैसे परत मागितले असता टाळाटाळ करण्यात आली. पुढे परतफेड म्हणून या ट्रॅव्हल्सने असोसिएशनला तीन चेक दिले होते. त्यापैकी प्रारंभीचे दोन चेक वटविण्यासाठी बँकेत जमा करण्यात आले असता ते बाऊन्स झाले. एकूणच या ट्रॅव्हल्सकडून असोसिएशनची फसवणूक करण्यात आली. शुक्रवारी अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिंगारे यांनी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. सरकार पक्षातर्फे या गंभीर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आरोपींच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. बचाव पक्षाने पोलीस कोठडी रिमांडला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील ए. पी. सिंग, फिर्यादीच्या वतीने अॅड. अतुल पांडे तर आरोपींच्यावतीने अॅड. पीयूष शुक्ला आणि अॅड. राजेश शाहू यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)