नागपूर रेल्वेस्थानकावर लागणार बॉटल क्रशिंग मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:56 AM2018-09-10T10:56:08+5:302018-09-10T11:13:04+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर बॉटल क्रशिंग मशीन लावण्यात येणार असून या मशीनच्या साहाय्याने प्लास्टिकच्या बॉटल क्रश करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यात पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल्सची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे या कचऱ्याला आळा घालण्यासाठी लवकरच विविध विभागांच्या सहकार्याने रेल्वेस्थानकावर बॉटल क्रशिंग मशीन लावण्यात येणार आहेत.
दूषित पाण्यामुळे अनेक आजार होत असल्यामुळे अनेक प्रवासी पिण्याच्या पाण्याची बाटली विकत घेतात. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेने परवानगी दिलेल्या अनेक कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकण्यात येते.
याशिवाय वॉटर व्हेंडींग मशीनवरही पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्यात येते. बॉटलमधील पाणी संपल्यावर अनेक प्रवासी या बॉटल रेल्वे रुळावर, रिकाम्या जागी, डस्टबिनमध्ये फेकून देतात. अनेकदा या बॉटल नालीत अडकल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे या समस्येपासून दिलासा मिळावा यासाठी रेल्वेस्थानकावर बॉटल क्रशिंग मशीन लावण्यात येणार असून या मशीनच्या साहाय्याने प्लास्टिकच्या बॉटल क्रश करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका, कॉनकोर कंपनी आणि रेल्वेकडून या बॉटल क्रशिंग मशीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
रिकाम्या बॉटल्सचा होणार नाही पुनर्वापर
रेल्वेस्थानकावर अनेक असामाजिक तत्त्व रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून प्रवाशांनी फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बॉटलमध्ये पुन्हा पाणी भरून त्याची कमी दराने विक्री करतात. कमी दरात या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल मिळत असल्यामुळे अनेक प्रवासी या बॉटल्सची खरेदी करतात. परंतु आता बॉटल क्रशिंग मशीन लागल्यामुळे या रिकाम्या बॉटल्सचा पुनर्वापर करण्यावर अंकुश येणार आहे.