‘बाऊन्सर’ प्रकरणात विद्यापीठ ‘बॅकफूट’वर

By admin | Published: December 29, 2016 02:44 AM2016-12-29T02:44:10+5:302016-12-29T02:44:10+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘बाऊन्सर्स’ नेमल्याप्रकरणात प्रशासन ‘बॅकफूट’वर गेले आहे.

In the 'bouncer' case, the university backfoots | ‘बाऊन्सर’ प्रकरणात विद्यापीठ ‘बॅकफूट’वर

‘बाऊन्सर’ प्रकरणात विद्यापीठ ‘बॅकफूट’वर

Next

खासगी सुरक्षा रक्षक हटणार : मुख्य प्रवेशद्वारदेखील उघडण्यात येणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘बाऊन्सर्स’ नेमल्याप्रकरणात प्रशासन ‘बॅकफूट’वर गेले आहे. खासगी सुरक्षा संस्थेचे हे ‘बाऊन्सर्स’ हटविण्यात येणार असून विद्यापीठाच्या संरक्षणाची जबाबदारी ‘महाराष्ट्र पोलीस सिक्युरिटी फोर्स’ कडे देण्यात येणार आहे. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वारदेखील सर्वांसाठी खुले होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘बाऊन्सर्स’ प्रकरणात विद्यापीठावर जोरदार टीका झाली होती.
विविध परीक्षा केंद्रांवरील पार्किंग शुल्काच्या मुद्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कुलगुरूंच्या कक्षात ‘सायकल चलावो’ आंदोलन केले होते. यानंतर तातडीने विद्यापीठाच्या सुरक्षेत वाढ केली. खासगी संस्थेचे सुरक्षारक्षक असतानाच आता कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या दालनापुढे ‘बाऊन्सर्स’ नेमण्यात आले. यानंतर विद्यापीठावर प्रचंड टीका करण्यात आली तसेच विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या. या मुद्यावर वातावरण तापल्यानंतर आता विद्यापीठातर्फे हे ‘बाऊन्सर्स’ नसल्याचाच दावा करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’कडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या वित्त समितीच्या बैठकीत या आशयाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर त्याला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात येईल. दरम्यान, विद्यापीठाचे स्थावर अधिकारी विनोद इलमे यांची चौकशी करण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)

कुलगुरूंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
विद्यापीठाच्या सुरक्षेच्या मुद्यावर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम् यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी कुलगुरूंना सुरक्षेसंदर्भात ‘एमएफएस’बाबत सुचविले. ही सुरक्षा एजन्सी पोलीस विभागाच्या अखत्यारित येत असून येथील सुरक्षा जवान पोलिसांच्या समकक्ष असतात. विशेष प्रशिक्षणातून हे जवान तयार झाले असतात. विशेष म्हणजे या सुरक्षा जवानांना अटक करण्याचेदेखील अधिकार असतात. शिवाय शस्त्रे बाळगण्याची या जवानांना मुभा असते.
विद्यार्थी संघटनांनी केले स्वागत
‘बाऊन्सर्स’ हटविण्यासंदर्भातील निर्णयाचे विद्यार्थी संघटनांंनी स्वागत केले आहे. विद्यापीठ हे विद्येचे मंदिर असून तेथे अशा प्रकारे ‘बाऊन्सर्स’ नेमणे अयोग्यच होते, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे या मुद्यावर आंदोलन करण्यात आले होते.

 

Web Title: In the 'bouncer' case, the university backfoots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.