दीक्षाभूमीला बौद्ध अनुयायांचे नमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:59 AM2017-10-15T00:59:44+5:302017-10-15T01:00:05+5:30
‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’अशी घोषणा केल्यानंतर २१ वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’अशी घोषणा केल्यानंतर २१ वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक क्रांतीचा ६१ वा अनुवर्तन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त दीक्षाभूमीला हजारो बौद्ध अनुयायांनी नमन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अनुयायांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
विशेषत: १४ आॅक्टोबरला शहरातील अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीला येत असतात. त्यामुळे शनिवारी बौद्ध अनुयायांचे पाय दीक्षाभूमीकडे वळले होते. सकाळपासूनच स्तुपाच्या परिसरात लोकांनी गर्दी केली होती. येणाºया अनुयायांची गर्दी लक्षात घेता यावेळीही नित्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती. रांगेत लागून अनुयायांनी बाबासाहेब व तथागताच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. भिक्खू संघाचीही यावेळी उपस्थिती होती. कुणी कुटुंबासह पोहचले तर विविध सामाजिक संघटना व विविध वस्त्यातील नागरिकांनी पायदळ रॅली काढली. मोठ्या संख्येने युवक मोटरसायकल रॅली काढून दीक्षाभूमीपर्यंत पोहचले. यामुळे तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. शेकडो उपासक-उपासिकांनी दीक्षाभूमी परिसरात असलेल्या विहारात भदन्त सुगत बोधी यांच्या नेतृत्वात पंचशील ग्रहण केले व २२ प्रतिज्ञांची शपथ घेतली. अनुयायांनी मिठाई वितरित करून एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान दीक्षाभूमी परिसरात बौद्ध साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते. विशेषत: दरवेळीप्रमाणे पुस्तकांच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. तथागत बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांसह प्रतिकांची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
१५० लोकांनी घेतली दीक्षा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्यावतीने समितीचे अध्यक्ष व धम्मसेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी १५० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. दीक्षार्थींना धम्म दीक्षेचे प्रमाणपत्र व चिवरदान करण्यात आले. भिक्खू संघातील ५० पेक्षा जास्त भिक्खू यावेळी उपस्थित होते. यावेळी पंचशील ग्रहण करून बाबासाहेब व तथागत बुद्धांचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमात भदंत नागघोष, भदंत नागसेन, भदंत नागधम्म, भदंत धम्मविजय, भदंत धम्मप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया, चंद्रशीला, यशोधरा, धम्मसुधा, बोधीप्रिया, शीलानंदा आदी उपस्थित होते.
वंदना करायलाही मनाई अनुयायांनी व्यक्त केली नाराजी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शनिवारी मोठ्या संख्येने बौद्ध-आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी आले होते. परंतु मध्यवर्ती स्मारकामध्ये तैनात पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून अनुयायांना वंदना करण्यास मनाई केली जात होती. ‘दर्शन घ्या आणि पुढे चला’, असा आदेश सोडला जात होता. अनेक अनुयायांशी वाद सुद्धा घातले जात होते. हा एकूणच संतापजनक प्रकार पाहून अनेक अनुयायांनी नाराजी व्यक्त केली. दीक्षाभूमीवर येणारे अनुयायी हे काही केवळ दर्शनासाठी येत नाहीत तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतात. मध्यवर्ती स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र अस्थिकलश व तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे. दर्शनासाठी येणारे अनुयायी त्रिशरण पंचशीलसह बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करतात. परंतु त्यांना साथी वंदनाही करू दिली जात नव्हती. दुसरीकडे स्मारकामध्ये अनुयायी बसणार नाही, याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी कठडे बांधण्यात आले होते. याबाबत अनुयायांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मारक समितीने याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी अनेक अनुयायांनी केली.
परिसरातच घेतले भोजन
शहरातील शेकडो लोक कुटुंबासह भोजनाचे साहित्य घेऊन दीक्षाभूमीवर पोहचले होते. नागरिकांनी या परिसरातील हिरवळीवर सहकुटुंब भोजनाचा आस्वाद घेतला. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी शेकडो कुटुंब सहभोजनाचा आनंद घेत असल्याने अलौकिक भावना निर्माण होत आहे. यासोबतच बुद्ध भीम गीतांची मेजवानीही या उत्साहात भर घालत असते. यामुळे एक वेगळे वातावरण दीक्षाभूमी परिसरात दिसून येत असते.
पोलीस व समता सैनिक दलातर्फे सुरक्षा
१४ आॅक्टोबरला दरवर्षी बौद्ध अनुयायांची गर्दी येथे होत असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचे उपाय केले जातात. रामदास पेठ ते संत चोखामेळा वसतिगृहापर्यंतचा मार्ग चार चाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. पोलिसांसह समता सैनिक दलाचे सैनिकही सुरक्षेसाठी तैनात होते. दलाच्या सैनिकांकडूनही अनुयायांना अनेक प्रकारची मदत केली जात होती.