बलिदान देणाऱ्या वीर शहिदांना नमन

By admin | Published: October 21, 2016 02:43 AM2016-10-21T02:43:51+5:302016-10-21T02:43:51+5:30

देशवासीयांचे भविष्य चांगले रहावे म्हणून स्वत:च्या वर्तमानाचे बलिदान देणाऱ्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी पोलीस लाईन टाकळी येथे

Bowing down to the martyrs who sacrificed | बलिदान देणाऱ्या वीर शहिदांना नमन

बलिदान देणाऱ्या वीर शहिदांना नमन

Next

‘आज पोलीस स्मृती दिन’ : शहिदांचे कुटुंबीय निमंत्रित
नगापूर : देशवासीयांचे भविष्य चांगले रहावे म्हणून स्वत:च्या वर्तमानाचे बलिदान देणाऱ्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी पोलीस लाईन टाकळी येथे ‘शहीद पोलीस स्मृती दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागपुरातील शहीद सुनील सनेश्वर आणि शहीद राजेशकुमार शाहू यांच्या कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांचा या कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे.
भारत आणि चीनच्या मॅकमोहन रेषेवर (कारगील क्षेत्राजवळ) समुद्रसपाटीपासून १६ हजार फूट उंचावर उणे (मायनस) ४१ डिग्री तापमानात २१ आॅक्टोबर १९५९ ला भारतीय जवान कर्तव्य बजावत होते. गरम पाण्याच्या झऱ्याजवळून (हॉटस्प्रिंग) ५ मैल अंतरावर चिनी सैनिकांच्या संशयास्पद हालचाली दिसल्यामुळे भारतीय वीरांनी तिकडे धाव घेतली. ते पाहून चिनी सैन्याने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. केंद्रीय सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक करणसिंग यांच्या नेतृत्वात कर्तव्यावर असलेले धरमसिंग, पूरणसिंग, नार्बू लांबा, बेगराजमल, माखनलाल, इमानसिंग, रोशरिंग बोर्खू नार्बू, हंगजीत सुब्बा आणि शिवनाथ प्रताप या दहा बहाद्दर वीरांनी मोठ्या संख्येत असलेल्या चिनी सैन्यांशी निकराने लढा देऊन आपल्या हद्दीत येण्यापासून रोखून धरले. दरम्यान, भारतीय सैन्यांची दुसरी तुकडी येत असल्याचे पाहून चिनी सैनिकांनी या दहा वीर जवानांचे मृतदेह पळवून नेले. तब्बल २४ दिवसानंतर चीनने या भारतीय वीरांचे छिन्नविछिन्न मृतदेह भारतीय सैन्याच्या हवाली केले. या घटनेचा केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून निषेध नोंदवण्यात आला. १४ नोव्हेंबरला या वीरांवर लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय जवानांनी स्वेच्छेने निधी संकलित करून या वीर जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हॉटस्प्रिंग येथे मोठे स्मारक बांधले. तुम्ही घरी गेल्यावर हे सांगा की, ‘तुमच्या (देशवासीय) उद्यासाठी आम्ही आमचा आज समर्पित केला आहे‘, असे या स्मारकावर लिहिले आहे. या भारतीय वीरांच्या कर्तव्य, राष्ट्रनिष्ठा आणि शौर्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी, या उद्देशाने २१ आॅक्टोबर हा दिवस ‘पोलीस स्मृती दिन‘ म्हणून पाळला जातो. दरवर्षी देशभरात कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या जवानांना (अधिकारी, कर्मचारी) या दिवशी मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.
नागपुरातील पोलीस मुख्यालयात (काटोल मार्ग) ‘पोलीस स्मृती दिन‘ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र प्रधान न्या. पुष्पा गणेडीवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्यासह सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. बीएसएफचे नागपुरातील शहीद जवान लान्सनायक सुनील हरिचंद सनेश्वर (रा. लकडापूल, महाल) आणि राजेशकुमार केदारनाथ शाहू (रा. सोमवारी क्वॉर्टर) यांच्या कुटुंबीयांना या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे. वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे. तसेच यंदा देशभरातील विविध भागात वीरमरण आलेल्या ४७१ (यात महाराष्ट्रातील पाच जवानांचा समावेश आहे) वीरांना कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bowing down to the martyrs who sacrificed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.