मुलगा की मुलगी स्पष्ट होत नाही; वेळीच करा मोफत शस्त्रक्रिया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 09:00 AM2023-06-28T09:00:00+5:302023-06-28T09:00:02+5:30
Nagpur News अस्पष्ट जननेंद्रिय ही अशी स्थिती आहे जिथे नवजात मुलगा आहे की मुलगी हे बाह्य जननेंद्रियातून स्पष्ट होत नाही. ही स्थिती गुणसूत्रातील विकृतींसह अनेक घटकांमुळे होऊ शकते. पूर्वी या बालकांकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते; परंतु आता यावरील उपचार व शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत.
-मेडिकलमध्ये २५, तर ‘एम्स’मध्ये तीन चिमुकल्यांवर शस्त्रक्रिया
नागपूर : अस्पष्ट जननेंद्रिय ही अशी स्थिती आहे जिथे नवजात मुलगा आहे की मुलगी हे बाह्य जननेंद्रियातून स्पष्ट होत नाही. ही स्थिती गुणसूत्रातील विकृतींसह अनेक घटकांमुळे होऊ शकते. पूर्वी या बालकांकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते; परंतु आता यावरील उपचार व शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पेडियाट्रिक सर्जरी विभागात आतापर्यंत तीन तर मेडिकलच्या पेडियाट्रिक सर्जरी विभागात २५ वर शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
-अस्पष्ट जननेंद्रिय म्हणजे काय?
अस्पष्ट जननेंद्रिय ही एक अतिशय दुर्मीळ स्थिती आहे. ज्यामध्ये जन्मानंतरही बाळाचे बाह्य जननेंद्रिय स्पष्ट होऊ शकत नाही. अस्पष्ट जननेंद्रिय असलेल्या बाळामध्ये गुप्तांग अपूर्ण विकसित होऊ शकतात किंवा बाळामध्ये दोन्ही लिगांची वैशिष्टे असू शकतात.
-५ हजारांत एकाला ही समस्या
जवळपास ५ हजार शिशूंत एकामध्ये अस्पष्ट जननेंद्रिय असू शकते. विविध तपासण्यांतून बालक आहे की बालिका आहे, याचे निदान होते. निदान झाल्यानंतर सुरुवातीला संबंधित हार्माेन्स वाढविण्यासाठी औषधोपचार केले जातात; परंतु त्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही तर शस्त्रक्रिया केली जाते.
-मुलांना कळण्याच्या आत करा शस्त्रक्रिया
पेडियाट्रिकस सर्जन्सनुसार, पाश्चात्त्य देशांत अशा स्थितीत संबंधित रुग्णावरच मुलगा व्हायचे की, मुलगा हा निर्णय टाकला जातो. कारण याच्याशी निगडित हार्माेन्सचा संबंध मेंदूशी असतो; परंतु भारतात तपासणी करून ज्याबद्दल अधिक स्पष्टता मिळते त्यानुसार शस्त्रक्रिया करतात. कमीत कमी वयात ही शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.
-मोफत शस्त्रक्रिया कोठे करणार?
मेडिकलच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागात व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) बालरोग शस्त्रक्रियेच्या विभागात ही शस्त्रक्रिया केली जाते. उपलब्ध माहितीनुसार, ‘एम्स’मध्ये आतापर्यंत ३ बालकांवर, तर मेडिकलमध्ये जवळपास २५ वर बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून मोफत शस्त्रक्रिया
एम्स, मेडिकलच्या पेडियाट्रिक सर्जरी विभागात अस्पष्ट आणि गुप्तांग पूर्णपणे विकसित न झालेल्या रुग्णांची कारणे शोधून सुरुवातीला उपचार व नंतर शस्त्रक्रिया केली जाते. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या दोन योजनांतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत होऊ शकते.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर