व्हॉटस्अॅपमुळे मिळाला हरवलेला मुलगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:59 AM2019-03-21T00:59:02+5:302019-03-21T01:01:04+5:30
कळमेश्वर येथील हरविलेला एक शाळकरी मुलगा व्हॉटस्अॅपमुळे त्याच्या घरी पोहचला. त्याला त्याच्या घरचा पत्ता शोधून देण्यासाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) एका सेवाभावी तरुणाने मोलाची भूमिका वठविली. या तरुणाने प्रसंगावधान राखत नकळत इंदूरला पोहचलेल्या मुलाचा व्हिडीओ बनवून तो व्हॉटस्अॅपवर व्हायरल केला. तो एका व्यक्तीने लक्षात आणून दिल्यानंतर मानकापूर पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या युवकाशी संपर्क साधून मुलाच्या नातेवाईकांना इंदूरला रवाना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमेश्वर येथील हरविलेला एक शाळकरी मुलगा व्हॉटस्अॅपमुळे त्याच्या घरी पोहचला. त्याला त्याच्या घरचा पत्ता शोधून देण्यासाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) एका सेवाभावी तरुणाने मोलाची भूमिका वठविली. या तरुणाने प्रसंगावधान राखत नकळत इंदूरला पोहचलेल्या मुलाचा व्हिडीओ बनवून तो व्हॉटस्अॅपवर व्हायरल केला. तो एका व्यक्तीने लक्षात आणून दिल्यानंतर मानकापूर पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या युवकाशी संपर्क साधून मुलाच्या नातेवाईकांना इंदूरला रवाना केले. प्रथमेश ऊर्फ आयुष्य बोरकर (वय १३) असे त्याचे नाव असून, तो कळमेश्वर जवळच्या कन्याढोल येथील रहिवासी आहे. मंगळवारी मानकापूर येथील एका सद्गृहस्थाने मानकापूर पोलिसांना व्हॉटस्अॅपवर एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगून, एक तरुण एका अल्पवयीन मुलाबद्दल माहिती देत आहे. हा मुलगा झिंगाबाई टाकळी येथील असल्याचे तो सांगत असल्याचेही त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. पोलीस शिपाई प्रमोद दिघोरे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविली. त्यांनी नागपुरात व्हिडीओ व्हायरल करून हरविलेल्या मुलाबाबत सविस्तर माहिती मिळविली. त्यामुळे या मुलाचे नाव प्रथमेश असून तो कन्याढोल (ता. कळमेश्वर) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. हा व्हिडीओ इंदूर (मध्य प्रदेश) येथील विशाल पाटील नावाच्या तरुणाने तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मानकापूर पोलिसांनी पाटीलसोबत संपर्क केला. शिपाई प्रमोदने प्रथमेशच्या नातेवाईकांची माहिती घेऊन त्याचे काका रंजन विनायक गजभिये (रा. सावनेर) यांनाही फोनवर माहिती कळविली. त्यांना तो व्हिडीओ दाखविला असता हा प्रथमेशच असून, तो आपला नातेवाईक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे नातेवाईक लगेच प्रथमेशला घेण्याकरिता इंदूरकडे निघाले. तत्पूर्वी पोलिसांनी नातेवाईक आणि प्रथमेशचे फोनवर बोलणे करून दिले. कुठलीही माहिती नसताना फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून एका हरविलेल्या मुलाचा शोध लागल्याने पोलीस तसेच त्याच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला आहे. मानकापूरचे ठाणेदार वजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनीष वाकोडे, फौजदार विजय नाईक, हवालदार सुनील मिलमिले, नायक इस्माईल, स्वप्निल शीतलाप्रसाद पांडे, आकाश राजेंद्र देवेकर यांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.