आंबे तोडायला गेलेला मुलगा बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:49+5:302021-05-05T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आंबे तोडायला गेलेला मुलगा नंतर मारण्याच्या धाकाने घरी परतच आला नाही. पारडी पोलीस स्टेशनच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंबे तोडायला गेलेला मुलगा नंतर मारण्याच्या धाकाने घरी परतच आला नाही. पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
आयुष लालचंद गोंडाणे (वय १४) असे बेपत्ता मुलाचे नाव आहे.
नागेश्वर नगरात राहणाऱ्या आयुषचे वडील १ मे रोजी सकाळी कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेले. ही संधी साधून आयुष त्याच्या मित्रासोबत आंबे तोडायला गेला. दुपारी १२ च्या सुमारास तो परतला. त्यावेळी त्याला वडिलांची दुचाकी घरासमोर दिसली. त्यामुळे तो घाबरला. वडील आता रागावतील आणि मारहाण करतील, असे त्याला वाटले. परिणामी तो घरात न जाता बाहेरच निघून गेला. आयुषला त्याच्या घरची मंडळी इकडे तिकडे शोधू लागली. त्याचा भाऊ पीयूष भांडेवाडीत फिरत असताना २ तारखेला त्याला आयुष दिसला. त्याने आयुषला घरी चलण्यास सांगितले. मात्र भीतीमुळे आयुष तेथून पळून गेला. तेव्हापासून तो बेपत्ताच आहे. त्याची आई सरस्वती लालचंद गोंडाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेपत्ता आयुषचा शोध घेतला जात आहे.
---