मित्रांसह पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:53+5:302021-05-07T04:08:53+5:30
कामठी : घरी न सांगता मित्रांसह पोहायला गेलेल्या मुलाचा कामठी तालुक्यातील नेरी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ...
कामठी : घरी न सांगता मित्रांसह पोहायला गेलेल्या मुलाचा कामठी तालुक्यातील नेरी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विशाल जोगिंदर मोहने (१५) रा. बिडगाव असे मृत मुलाचे नाव आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिडगाव, गुलाल कंपनीमागे येथे राहणारा विशाल जोगिंदर मोहने (१५) यांच्यासह तिघे मित्र बुधवारी घरी कुणालाही न सांगता नेरी शिवारातील कन्हान नदीवर पोहायला गेले होते. पाण्यात मौजमस्ती करीत असताना पाण्याच्या अंदाज न आल्याने विशाल जोगिंदर मोहने हा पाण्यात बुडाला. सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता तो गवसला नाही. त्यांनी घाबरून याची सूचना त्याच्या घरच्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच विशालच्या वडिलांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुठेही मिळाला नसल्याने रात्री उशिरा पोलिसांना सूचना देण्यात आली. सूचना मिळताच नवीन कामठी येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु अंधारामुळे शोधकार्य होऊ शकले नाही. गुरुवारी सकाळी विशालचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.